सांगली : ओबीसी आरक्षणामुळे पालिका निवडणुकीत चुरस!

सांगली : ओबीसी आरक्षणामुळे पालिका निवडणुकीत चुरस!
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील उरूण- इस्लामपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा नगरपालिकांच्या निवडणुकीवर ओबीसी आरक्षण निश्‍चितीचा चांगलाच परिणाम होणार आहे. निवडणुकीमध्ये या पाचही नगरपालिकांत मिळून साधारणत: ओबीसीचे पस्तीस सदस्य येणार आहेत. दरम्यान, केंद्रात तसेच राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे हा पक्ष या नगरपालिकांच्या निवडणुकीत जोरदार ताकद लावण्याची शक्यता आहे. उमेदवारांना सर्वच प्रकारची रसद मिळाल्याने पाचही ठिकाणी जोरदार चुरस निर्माण होणार आहे.

इस्लामपुरात चुरस होणार

जिल्ह्यात चुरशीची लढत उरूण-इस्लामपूर नगरपालिकेसाठी होणार हे निश्चित आहे. या ठिकाणी 15 प्रभाग असून 30 उमेदवार आहेत. यात आठ जागा ओबीसीसाठी आलेल्या आहेत. त्यामध्ये चार पुरुष आणि चार महिलांसाठी असतील. राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील समर्थकांना येथे विरोधकांशी जोरदार सामना करावा लागणार आहे. प्रामुख्याने येथे राज्याची हातातून गेलेली सत्ता, सत्तेचे नसलेले 'कव्हर' हा राष्ट्रवादीसाठी 'मायनस' पाँईंट ठरू शकतो. तर सत्तांतरामुळे भाजपा, रयत क्रांती संघटना यांच्यात उत्साह आहे.

आष्ट्यात 'अंडरस्टँडिंग' की चुरस?

आष्टा शहरात 27 वर्षांपासून दिवगंत माजी आमदार विलासराव शिंदे आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात 'अंडरस्टँडिंग' राहिले होते. मात्र यातून संधी मिळत नसल्याने जयंत पाटील समर्थकांतील असंतोष आता जयंत पाटील कसा 'कंट्रोल' करतात, याकडे लोकांचे लक्ष आहे. राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे हे माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, माजी गटनेते विशाल शिंदे यांच्या जोडीने कशी लढत देतात, याची उत्सुकता आहे. या ठिकाणी बारा प्रभाग असून यातील 24 पैकी सहा ते सात जागा या ओबीसींसाठी असणार आहेत.

तासगावात तिरंगी लढतीची शक्यता

तासगाव येथे सध्या खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे. ओबीसी आरक्षणामुळे त्यांना या निवडणुकीत आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. सध्या या ठिकाणी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. एकूण चोवीस जागांपैकी सात जागा या ओबीसींना मिळणार आहेत.

विट्यात आजी – माजी आमदार आमनेसामने

विटा शहरात महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या गोटात जोश होता. मात्र राज्यात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात आमदार अनिलभाऊ बाबर डेरेदाखल झाले. यातून बाबर गटाला मोठी ऊर्जा मिळणार आहे. येथे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार सदाभाऊ पाटील यांनी 'मिशन आमदारकी' राबवून तयारी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सदाभाऊ पाटील, युवा नेते वैभव पाटील यांना ताकद दिली आहे. येथे तेरा प्रभागात 26 जागा आहेत. त्यापैकी सात जागा ओबीसीला मिळणार आहेत. तर त्यात चार महिला तर तीन पुरुष ओबीसी साठी असणार आहेत.

पलूसमध्ये स्थानिक आघाड्या

पलूस पालिकेची निवडणूक पुन्हा स्थानिक आघाड्यांमध्येच रंगेल. समर्थकांच्या आघाड्यांना माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची ताकद राहणार आहे. राज्यातील सत्तांतराचे या ठिकाणी चांगलेच पडसाद उमटतील. कडेगाव येथे झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री कदम यांना फटका बसला. त्यामुळे येथे विरोधकांत उत्साहाचे वातावरण आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news