पंढरपूर : ऐन आषाढी यात्रेत मंदिर कर्मचार्‍यांचे आंदोलन?

ऐन आषाढी यात्रेत मंदिर कर्मचार्‍यांचे आंदोलन?
ऐन आषाढी यात्रेत मंदिर कर्मचार्‍यांचे आंदोलन?

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना महाराष्ट्र शासनाच्या स्थायी कर्मचा-यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्यात यावेत, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मागण्या मान्य करा अन्यथा जुलैपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कर्मचार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे ऐन आषाढी यात्रेत मंदिर समिती व कर्मचार्‍यांचे आंदोलन होणार की काय असा सवाल निर्माण झाला आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष व कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने व समक्ष भेट घेवून कर्मचार्‍यांनी महाराष्ट्र शासनाच्या स्थायी कर्मचा-यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्याबाबत चर्चा केली होती. त्यावेळी मंदिर समिती कर्मचा-यांना वेतन व भत्ते वाढवून देण्यास सकारात्मक आहे, असे सांगीतले होते. याबाबत मंदिर समितीच्या दि.25 मार्च रोजीच्या सभेत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. या आश्वासनास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही मंदिर समितीने कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही केलेली नाही. आश्वासन दिल्यानंतर मंदिर समितीची दि.12 मे रोजी सभा झाली. त्यामध्ये देखील मंदिर समितीने निर्णय घेतलेला नाही. यावरून मंदिर समिती कर्मचा-यांना शासनाच्या स्थायी कर्मचा-यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्यास विलंब करित असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांची शुक्रवार दि. 10 जून रोजी दुपारी 3 वाजता श्री संत नरहरी सोनार मठ पंढरपूर येथे बैठक घेतली. या बैठकीध्ये श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समिती यांनी आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांना शासनाच्या स्थायी कर्मचा-यांप्रमाणे तात्काळ वेतन व भत्ते लागू करावे, अन्यथा जूलै 2022 पासून आंदोलन करण्याचा ठराव केला आहे. दरम्यान, वाढती महागाई व तटपुंज्या वेतनामुळे कर्मचार्‍यांना घरखर्च भागविणे जिकीरीचे होत आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर समिती कर्मचार्‍यांचा प्रश्न सोडवून आषाढी यात्रा निर्विघ्नपणे पार पाडणार की प्रश्न रेंगाळत राहणार, याकडे कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

बैठकीस 100 कर्मचार्‍यांची उपस्थिती

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील 100 कर्मचारी उपस्थित होते. 7 ते 30 वर्षे इतकी सेवा झालेले कर्मचारी मंदिर समितीच्या आस्थापनेवर तटपुंज्या वेतनामध्ये काम करीत आहेत. सध्या वाढती महागाई लक्षात घेता, मंदिर समितीने सकारात्मक निर्णय घेऊन मंदिर कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांनाप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावेत, अशी अपेक्षा कर्मचारी वर्ग व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news