जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील 24 हजार 282 हेक्टर क्षेत्रावरील ऊस महापुरामुळे बाधित झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र दत्त-शिरोळचे 2700 हेक्टर, वारणा 2 हजार 682 व दत्त दालमियाचे 2 हजार 235 हेक्टर बाधित झाले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कारखाना कार्यक्षेत्रातील सरासरी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत उसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे साखर उत्पादनात 10 टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज कारखान्यांच्या शेती विभागांनी व्यक्त केला आहे.
कृषी विभागाने केलेल्या नजर अंदाजानुसार जिल्ह्यातील 58 हजार हेक्टर जमिनीचे क्षेत्र पुराच्या पाण्यामुळे बाधित झाले आहे. त्यात उसाचे क्षेत्र 24, 282 हेक्टर आहे, तर उर्वरित क्षेत्र इतर पिकांचे आहे. जिल्ह्यात एकूण 1 लाख 63 हजार 922 हेक्टवर उसाचे क्षेत्र असल्याची नोंद प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे झालेली आहे. यातील 24 हजार क्षेत्र महापुराच्या पाण्याने बाधित झाले होते, बाधिताचे प्रमाण सर्वसाधारणपणे 10 ते 15 टक्के असे आहे.
नदीकाठच्या उसाचे नुकसान
जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या काठावर उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. सुपीक जमीन असल्यामुळे या जमिनीत ऊस चांगला येतो, पण महापुरामुळे या उसाला मोठ्या प्रमाणावर फटका बसतो. परिणामी चांगले क्षेत्र बाधित होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. महापुराचा फटका जिल्ह्यातील प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाला बसला आहे. कारखान्यांनी बाधित क्षेत्राचा सर्व्हे केला आहे. बाधित क्षेत्राचा विचार करता सध्या तरी 10 टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज आहे, असे प्रादेशिक साखर सहसंचालक एस. एन. जाधव यांनी सांगितले.
कारखानानिहाय बाधित क्षेत्र
वारणा 2,682 हेक्टर
पंचगंगा 1,981 हेक्टर कुंभी 1,664 दूधगंगा-बिद्री 1,059 भोगावती 1,250 दत्त शिरोळ 2,700 दौलत चंदगड 1,170
गडहिंग्लज-हरळी 289
शाहू-कागल 897
राजाराम-बावडा 1,750
आजरा 112, उदयसिंगराव गायकवाड-बांबवडे 1,161 स.म. मंडलिक 698
शरद-नरंदे 490 डी.वाय. 1,56 दत्त दालमिया-आसुर्ले 2,235 गुरुदत्त-टाकळी 1,002 तांबाळे 735 इकोकेन 69, कोलम अॅग्रो 527