अर्थसंकल्प २०२२ : राजर्षी शाहू विचारांचा होणार वर्षभर जागर

अर्थसंकल्प २०२२ : राजर्षी शाहू विचारांचा होणार वर्षभर जागर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : अर्थसंकल्प २०२२ : राजर्षी शाहू छत्रपतींचे यंदाचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. हे वर्ष कृतज्ञता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. त्याचबरोबर येथील राजर्षी शाहू छत्रपतींच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे स्मारक राजर्षी शाहू छत्रपती मिलच्या जागेत होणार आहे.

येत्या दि. 6 मे रोजी राजर्षी शाहू छत्रपती यांचा 100 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचे स्मारक उभारण्यात येणार असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

राजर्षी शाहू मिलच्या जागेवर हे स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या पुढाकाराने 250 कोटी रुपयांचा स्मारक आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी प्रत्यक्ष कोणतीही तरतूद करण्यात आली नसली, तरी सरकारने अर्थसंकल्पात त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे सांगितले आहे.

त्याचबरोबर संपूर्ण वर्षभर राज्यात सर्वत्र राजर्षींच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे. त्यासाठी हे वर्ष कृतज्ञता वर्ष म्हणून सरकार साजरे करणार आहे.

राजर्षींचे मूळ घराणे असलेल्या कागल येथील हिंदुराव घाटगे विद्यामंदिर शाळेला 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्थेला (सारथी) विविध विकास योजनांसाठी 250 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. 'सारथी'चे उपकेंद्र कोल्हापुरात असून, या 250 कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हापूर उपकेंद्रालाही निधी मिळणार आहे.

अर्थसंकल्प २०२२ : कोल्हापुरात होणार शंभर बेडस्चे महिला रुग्णालय

कोल्हापूर ः अर्थसंकल्पात कोल्हापूरसह राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 100 बेडस्च्या स्वतंत्र महिला रुग्णालयांच्या उभारणीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील उपचारासाठी होणारी महिलांची परवड थांबणार आहे. जिल्ह्यात स्वतंत्र महिला रुग्णालय नाही. त्यामुळे सीपीआरसह महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयावर महिला रुग्णांचा मोठा ताण आहे.

अत्याधुनिक 100 बेडस्च्या रुग्णालयामुळे महिलांना एकाच छताखाली उपचार घेणे सोयीचे होणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. 2013 मध्ये या 100 बेडस्च्या महिला रुग्णालयास मंजुरी मिळालेली आहे.

शिवाजी विद्यापीठास 10 कोटी रुपये निधी

राज्याच्या अर्थसंकल्पात शिवाजी विद्यापीठाला दहा कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज संशोधन केंद्र व संग्रहालय संकुल, यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रशाला व अन्य विभागांतील आधुनिकीकरणासाठी त्याचा वापर केला जाणार आहे.

राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्राचे काम सुरू आहे तसेच राजर्षी शाहू महाराज संग्रहालय संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी विरगळसह विविध गोष्टी ठेवल्या जाणार आहेत.

यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रशाला विभागांतर्गत एमसीए, एमबीए, एमआरएस, एमएसडब्ल्यू हे अभ्यासक्रम चालविले जातात. अर्थसंकल्पात नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीसह विविध प्रकल्पांचा प्रस्ताव पाठविले होते.

अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी बजेटमध्ये 25 कोटींची तरतूद

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत अंबाबाई मंदिर परिसरातील विकासकामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. यामुळे मंदिरातील विकासकामांना चालना मिळणार आहे.

राज्य सरकारच्या शिखर समितीने 2018 मध्ये तीर्थक्षेत्र आराखड्यांतर्गत अंबाबाई मंदिरासाठी 80 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली होती. महापालिकेने स्वनिधीतून 7 कोटी रुपये देण्याची तयारी सरकारकडे दर्शविली होती. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात दर्शन मंडपाची इमारत, भक्त निवास व पार्किंग इमारत, सार्वजनिक स्वच्छतागृह, सरस्वती टॉकिज व बिंदू चौकनजीक बहुमजली पार्किंग बांधणे, बस स्टॉप या मुख्य कामांबरोबरच पादचारी मार्ग तयार करणे, दिशादर्शक फलक बसविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, अग्निशमन व सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, अशी कामे नियोजित आहेत.

यापूर्वी उपलब्ध झालेल्या 8 कोटी रुपयांच्या निधीतून सरस्वती टॉकिजजवळ बहुजमली पार्किंगचे काम सुरू आहे. अर्थसंकल्पात जाहीर झालेला 25 कोटींचा निधी आराखड्यातील कोणत्या कामांसाठी देण्यात आला आहे, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरणाला गती

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाला गती येणार आहे. राज्याच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या भूसंपादन आणि निर्वनीकरणाच्या कामाचा अर्थमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला.

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. सध्या असलेली 1 हजार 370 मीटर लांबीची धावपट्टी 2 हजार 300 मीटर वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त 64 एकर जागेचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू आहे. विमानतळासाठी संपादित केलेल्या वन विभागाच्या जागेचेही निर्वनीकरण करण्याची प्रक्रिया केली जात आहे.

मार्च 2023 नंतर बोईंग, एअर बसही उतरणार

मार्च 2023 पर्यंत पूर्ण 2 हजार 300 मीटर लांबीची धावपट्टी तयार होईल, अशी शक्यता आहे. 2 हजार 300 मीटरची धावपट्टी झाल्यानंतर कोल्हापूर विमानतळावर बोईंग, एअर बस यासारखी मोठी विमाने उतरणार आहेत. यामुळे कोल्हापूरची विमानसेवाही विस्तारण्यास मदत होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news