अमृतयोग

अमृतयोग

पंचाहत्तर वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा साकारण्याची वेळ आली आहे. "मध्यरात्रीच्या वेळी सारे जग झोपलेले असताना, भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे," असे उद‍्गार स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री काढले होते. देशभर स्वातंत्र्याचा जल्लोष होत असताना पंडित नेहरूंनी भारताने नियतीशी केलेल्या कराराची उद्घोषणा केली. त्यानंतर तब्बल 75 वर्षांचा प्रवास करून भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे.

पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी असा हा अनेक वळणांचा प्रवास. देशाच्या जडणघडणीचा, उभारणीचा प्रवास. कोणत्याही देशासाठी आणि त्या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी अमृतयोग ठरावा, असाच हा दिवस. रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव आणि त्यानंतर अमृत महोत्सव हा या वाटचालीमधील एक महत्त्वाचा टप्पा. देशभरात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अमृत महोत्सवाचा जल्लोष केला जातोय. प्रत्येक भारतीय नागरिक अंतर्बाह्य तिरंगी रंगात रंगून गेला आहे. घरोघरी तिरंगा मोहिमेमुळे या उत्सवाला सणाचे माहात्म्य प्राप्त झाले आहे. या महत्त्वाच्या टप्प्यावर आजवरच्या वाटचालीकडे मागे वळून पाहताना या प्रवासाचे मूल्यमापनही करावयास हवे. ते करताना आजच्या घडीला आपण कुठवर पोहोचायला हवे होतो आणि प्रत्यक्षात कुठपर्यंत पोहोचलो आहोत, याचाही लेखाजोखा मांडावयास हवा. या प्रवासात नव्या कोणत्या गोष्टी कमावल्या आहेत आणि आपल्याजवळच्या कोणत्या गोष्टी गमावल्या आहेत, याचाही धांडोळा घेण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा हा दिवस महत्त्वाचा आहे. 2047 सालाकडे म्हणजे स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करताना आपली दिशा काय असायला हवी, हेही निश्‍चित करण्याचा हा टप्पा आहे. अर्थात, हे सगळे बोलायला सोपे असले तरी प्रत्यक्ष तसा प्रयत्न करणे खूप कठीण आहे. अभिमान वाटावे, डोक्यावर घेऊन मिरवावे असे अनेक क्षण या प्रवासात आहेत.

आणीबाणीसारख्या काही कटू आठवणीही आहेत. ज्या संविधानाने देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवली आहे, त्या संविधानाबाबत काळजी वाटायला लावणारे प्रसंगही आहेत. जागतिक पातळीवरील राजकारण बदलत असताना त्याचे परिणाम भारतासारख्या देशावर होणे अपरिहार्य आहे. ते झालेही; पण या अमृतमंथनातून देशाचा प्रवास अधिक प्रगल्भ लोकशाहीकडे आणि चौफेर विकासाच्या मार्गावरील महासत्तेकडे सुरू आहे. फाळणीच्या जखमा अंगावर घेत त्यातून नवे काही शिकत देश नव्या सामर्थ्याकडे वाटचाल करतो आहे. पाकिस्तानसोबतचे युद्ध जिंकत आणि आक्रमणे परतवून लावत ही लष्करी शक्‍ती आपले पाय मजबूतपणे रोवून उभी आहे. आधुनिक भारताची वैज्ञानिक पायावर उभारणी केली गेली, ती विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रेरणा आजही नवनवीन शिखरे सर करते आहे. अण्वस्त्रसज्जतेसोबत आता अंतराळ झेपही या वाटा विशाल करते आहे.

पंडित नेहरूंनंतरच्या लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी यांनी देशाचा हा ठेवा बळकट करण्याचा प्रयत्न केला. देशाचे स्वातंत्र्य वर्धिष्णू करण्यात लाभलेले आणि वेळोवेळी विश्‍वास जागवणारी मजबूत घटनात्मक चौकट हेही एक ठळक आणि वेगळे न करता येणारे वैशिष्ट्य. ज्या देशात टाचणीही तयार होत नव्हती, तो देश स्वतःचा उपग्रह अवकाशात सोडू लागला. भाक्रा-नांगल धरण राष्ट्राला अर्पण करताना, 'हे उगवत्या भारताचे तीर्थक्षेत्र'असल्याचे म्हटले गेले. अशी अनेक तीर्थक्षेेत्रे विकासाच्या पाऊलखुणा शिरावर मिरवत आहेत.

हरितक्रांतीने देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवले. औद्योगिक पाया घातला गेला आणि अन्नाबरोबरच वस्त्र आणि निवार्‍याचा, दळणवळणाचा मोठा पल्ला देशाने गाठला. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या मूलभूत संशोधन करणार्‍या संस्थांची उभारणी केली. शिक्षणाचा अंध:कार दूर झाला. दिल्ली विद्यापीठ आणि आयआयटीच्या माध्यमातून उत्तम दर्जाच्या उच्च व तांत्रिक शिक्षणाचा पाया घातला. विविध विषयांच्या प्रयोगशाळांचे, समाजविज्ञान संस्थांचे जाळे विणले. सार्वत्रिक शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न झाले. रूढीग्रस्तांच्या विरोधाला न जुमानता हिंदू स्त्रियांना कायद्यात समान अधिकार मिळवून दिले. आज आपण जो आधुनिक भारत म्हणतो, तो याच सामूहिक प्रयत्नांतून साकारला. स्वातंत्र्याचा हा अमृतयोग साजरा करण्याची संधी प्रत्येक भारतवासीयाला मिळाली आहे. तो साजरा करताना भूतकाळात डोकावलेच पाहिजे, स्वातंत्र्यलढ्याचे, अनेक सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण जागवण्याचा हा दिवस. पंचाहत्तर वर्षांचा हा प्रवास भारतीयांच्या चौफेर प्रगतीचा आलेख मांडणारा आहे. कृषी, उद्योग, व्यापार, विज्ञान-तंत्रज्ञान आणि आर्थिक आघाडीवरील प्रगतीबरोबरच प्रमुख सामाजिक क्षेत्रातही ही घोडदौड वेगाने सुरू आहे. देश अमृतयोग साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली ती अधिक व्यापक, नवी ऊर्मी जागवणारी ठरेल, हा आशावाद जागवण्यात त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार यशस्वी ठरते आहे.

व्यापक समाजहित साधताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ही विकासाची गंगोत्री पोहोचविण्याचे मोठे आव्हान आहे. सर्व जाती-धर्मबांधवांना, घटकांना 'माझा देश' नावाच्या एकाच धाग्यात बांधण्याचे, देश बलवान करताना विकासाची गोड फळे चाखण्याची समान संधी देणे हे आजही आव्हान आहे. दहशतवाद, हिंसाचारासोबतच बेकारी, बेरोजगारी, भ्रष्टाचार हद्दपार करायचा आहे. कला-साहित्याबरोबर संस्कृतीची मूठ घट्ट बांधायची आहे. कोणत्याही देशाची वाटचाल त्या देशाच्या नेतृत्वावर अवलंबून असते. ती उज्ज्वल दिशेनेच होईल, असा विश्‍वास 'सबका साथ सबका विकास' असा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या मनात जागवला आहेे. एकविसाव्या शतकातील विश्‍वशक्‍ती बनण्याचे स्वप्न त्यांनी दाखवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे, "माना की अंधेरा बहुत घना है, लेकिन दीपक जलाना कहाँ मना है?" स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news