…अन् चिमुकल्यांचे पाय थिरकले

...अन् चिमुकल्यांचे पाय थिरकले
...अन् चिमुकल्यांचे पाय थिरकले

नंदगाव : पुढारी वृत्तसेवा नंदगाव व खेबवडे (ता. करवीर) परिसरातील मुला-मुलींनी सुट्टीत लेझीम शिकणे पसंत केले. सुट्टीला मामाच्या गावी न जाता लेझीम शिबिराला हजेरी लावली. हलगी, घुमके, कैताळाच्या ठेक्यात लेझीमचे 15 ते 20 प्रकार त्यांनी अवगत केले व आनंदाने खेळलेही. श्री गुरुप्रसाद भजनी मंडळ प्रणीत भगवा ग्रुप नंदगाव यांनी शिवकालीन लेझीम खेळ ही कला जिवंत राहावी, यासाठी 11 मे ते 10 जून 2022 या कालावधीत मोफत लेझीम शिबिर आयोजित केले होते.

खेबवडे, नंदगाव परिसरातील 80 मुले-मुली रोज सायंकाळी 5 ते 7.30 या वेळेत गावातील दत्त मंदिरमध्ये लेझीम शिकतात. श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरीचे सहायक शिक्षक, लेझीम प्रशिक्षक अतुल अनिल कुंभार हे या 80 मुलांना घडविण्याचे काम करत आहेत. प्रत्येक मुलाला कोणते ना कोणते मैदानी खेळ यावेत, त्यांचा व्यायाम व्हावा, मुले सुदृढ व सृजनशील बनावीत, या उदात्त हेतूने गेली 5 वर्षे अतुल कुंभार फी न घेता, कोणाचेही वय न पाहता लेझीम शिकवण्याचे काम करत आहेत. कोल्हापुरातील पहिले महिलांचे लेझीम पथक बनविल्याबद्दल तत्कालीन आ. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

कणेरी, नंदगाव, कोल्हापूर शहर, खेबवडे परिसरातील 550 मुला-मुलींना त्यांनी मोफत लेझीम प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझीमचे प्रात्यक्षिके दाखविली आहेत. नंदगाव व परिसरातील ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

लेझीम हा एक शिवकालीन खेळ आहे. अतिशय आनंददायी असा हा व्यायाम प्रकार आहे. सर्वांनी लेझीम शिकावी. मोबाईलवरील गेम व डॉल्बीवर नाचण्यात जितका आनंद मिळतो, त्याच्या कित्येक पटीने हलगीच्या ठेक्यात लेझीम खेळण्यात आनंद मिळतो.
– अतुल कुंभार,
लेझीम प्रशिक्षक, नंदगाव

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news