India Pakistan Match : विश्वचषकाची तयारी दाखवणारा सामना

India Pakistan Match : विश्वचषकाची तयारी दाखवणारा सामना

आशिया चषकातील भारत-पाकिस्तान पहिला सामना अर्धवटच राहिल्याने आपल्या संघातील जणांची झाकली मूठ तशीच राहिली आणि निव्वळ तर्कवितर्कांच्या चर्चा झाल्या. सुपर फोरचा दुसरा अतिमहत्त्वाचा सामना आज पुन्हा भारत-पाकिस्तान संघात होत आहे. हा सामना क्रिकेट आणि जाहिरात उत्पन्न यांच्या द़ृष्टीने इतका महत्त्वाचा आहे की चालू स्पर्धेत नियम बदलून केवळ या सामन्याला राखीव दिवस ठेवला गेला. बांगला देश क्रिकेटने याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. जी-20 देशाचा सदस्य नसताना बांगला देशला पाहुणा सदस्य म्हणून जरी निमंत्रण असले तरी क्रिकेटच्या महासत्तेच्या रांगेत ते अजून दूरच असल्याने त्यांच्या नापसंतीला कुणीच किंमत दिली नाही. भारताचा संघ पल्लेकेलेपासून कोलंबोला आला तरी पावसाने पाठ सोडली नाही त्यामुळे शनिवारी सकाळचे सराव सत्र इनडोअर करावे लागले. या सराव सत्रात के. एल. राहुलने कसून फलंदाजीचा सराव केला, पण त्याने यष्टिरक्षण केले नाही.

विश्वचषकासाठीच्या भारतीय संघाच्या निवडीवरून राहुल हा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पहिली पसंती दिसते, पण त्याचे यष्टिरक्षणचा सराव न करण्यामुळे भारतीय थिंक टँकमध्ये इशान किशनला संघात ठेवून राहुल किंवा अय्यर यांच्यापैकी एकाची निवड करण्याचा विचार चालू आहे का, कळायला मार्ग नाही. विश्वचषकाच्या आधी या सर्व शक्यतांचा अंदाज घेऊन आपला संघ तयार करण्याच्या द़ृष्टीने आजच्या सामन्याला खूप महत्त्व आहे. आज जगातील उत्तम जलदगती मार्‍यासमोर आपले कुठचे फलंदाज कसे खेळतात हे पडताळून पाहायची आजचा सामना नामी संधी आहे. पहिल्या सामन्याचा विचार केला तर आपले फलंदाज आफ्रिदी, रौफ आणि नसीम शाह पुढे निष्प्रभ ठरले अपवाद पंड्या आणि इशान किशनचा. एक दिवसीय सामन्यात दोन चेंडू वापरत असल्याने चेंडू तसाही जुना होत नाही, पण तरीही डावाच्या सुरुवातीची दहा षटके सामन्याचा नूर ठरवायला पुरेशी असतात तेव्हा ही दहा षटके विकेट न गमावून देता खेळून काढायला आपल्याकडे काय पर्याय आहेत हे बघणे महत्त्वाचे. गेल्या सामन्यातल्या किशन आणि पंड्या यांच्या खेळीचे महत्त्व कमी करायचा हेतू नाही, पण किशन दहाव्या आणि पंड्या पंधराव्या षटकात मैदानात उतरले होते.

क्रिकेटमध्ये 'फर्स्टब्लड'; म्हणतात ते पाकिस्तानी गोलंदाजांना न मिळवून द्यायला आपल्याला रणनीती ठरवावी लागेल जी पुढे विश्वचषकातही उपयुक्त ठरेल. रोहित शर्मा आणि कोहली ही नावे पहिल्या पाचमध्ये नक्की धरली तर सलामीला पर्याय आहेत ते शुभमन गिल किंवा किशन आणि चौथ्या आणि पाचव्या स्थानासाठी पर्याय आहेत पुन्हा किशन, राहुल, अय्यर आणि सूर्यकुमार. शुभमन गिलची आतापर्यंत 29 सामन्यांतली सरासरी बघितली तर 63 ची आहे, पण जरा खोलात जाऊन बघितले तर जगातल्या उत्तम गोलंदाजीविरुद्ध म्हणजेच ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्याविरुद्धचे 16 सामने बघितले तर ती सरासरी 31 पर्यंत कमी येते यात एक द्विशतक आणि एका शतकाचा समावेश आहे. बोल्ट, हेन्री, स्टार्क, रबाडा, एन्गिडी आणि या आशिया चषकात रौफ यांची तो शिकार झाला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या आधी ग्रेग चॅपलने गिलच्या तंत्रातील दोष दाखवत त्याला ज्या खेळपट्टीवर थोडा जरी बाऊन्स असेल तिथे ऑफ स्टम्पच्या बाहेरची वेगवान गोलंदाजी त्याला त्रास देईल हे भविष्य वर्तवले होते. फुल लेंग्थचे चेंडू खेळायला त्याची हेड पोझिशन, फ्रंट फूट चेंडूच्या रेषेत आणण्यात तो अपयशी ठरत आहे. 29 सामन्यांचा अनुभव का इशान किशनचा फॉर्म आणि डावखुरे असण्याने डाव्या-उजव्या जोडीचा फायदा याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यायचा आहे. सामन्याआधीची पत्रकार परिषद घायला काल गिलला पाठवल्याने त्याला वगळायची इच्छा तर दिसत नाही. तेव्हा प्रश्न उरतो तो राहुलला सराव द्यायला आज वगळायचे कोणाला? गेल्या सामन्यात उत्तम फलंदाजी करून आत्मविश्वासाच्या शिखरावर असणार्‍या किशनला वगळले तर अन्यायकारक होईल. सूर्यकुमार यादवचा टी-20 स्पेशालिस्टचा शिक्का पुसून टाकायला त्याला अवधी नाही तेव्हा त्याचा विचार होणार नाही.

आपण आतापर्यंतच्या दोन सामन्यांत पाकिस्तानविरुद्ध शमीला तर नेपाळविरुद्ध बुमराहला खेळवले नाही. यात पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी बळकट करायला तर दुखापतीतून नुकताच सावरलेल्या बुमराहला दुबळ्या नेपाळविरुद्ध विश्रांती देण्याचा हेतू होता. विश्वचषक तोंडावर आलेला असताना आपल्याला आपले सर्वोत्तम गोलंदाज हे सर्व सामन्यांत खेळवले पाहिजेत. पाकिस्तानचे जलदगती त्रिकूट हे बळी मिळवण्यासाठी जोडीजोडीने शिकार करतात आणि कुठच्याही जलदगती गोलंदाजीचे हे शास्त्र असते. यात एखाद्या गोलंदाजांचा दिवस नसला तर दुसरे तोडीचे गोलंदाज सावरून घ्यायला असतात. नेपाळने सिराजला फटकावले, पण शार्दूल ठाकूरने ही साडेसहाच्या सरासरीने धावा दिल्या. याच कारणासाठी फलंदाजी बळकट करायच्या नावाखाली प्रमुख गोलंदाजांचे त्रिकूट वारंवार विस्कळीत करणे हिताचे नाही. बुमराह, सिराज, शमी, कुलदीप, जडेजा, पंड्या हेच आपल्या पन्नास षटकांचे मानकरी असायला हवेत. आजचा सामना पूर्ण होईलच आणि अनेक झाकल्या मुठीत काय दडलंय याचा उलगडा होईल. भारत-पाकिस्तान सामन्यात जिंकणे हे अनिवार्य आहेच, पण एका दर्जेदार, परिपूर्ण आणि संतुलित संघाशी होणार्‍या सामन्याची विश्वचषकासाठी आपली तयारी आजमावून पाहायलाही या सामन्याचे महत्त्व आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news