World Book Day : पुस्तकविश्व बहरतेय; रोज पुण्यात 3 ते 4 मराठी पुस्तकांची भर

World Book Day : पुस्तकविश्व बहरतेय; रोज पुण्यात 3 ते 4 मराठी पुस्तकांची भर

पुणे : सुवर्णा चव्हाण : एका महिन्यात जवळपास 100 हून अधिक नवीन पुस्तके येत असल्याचे ऐकून आश्चर्य वाटेल… हे खरंय… पुस्तकविश्वात रोज नव्या विषयांवरील पुस्तकांची भर पडत असून प्रकाशन संस्थांकडून कवितासंग्रह असो वा माहितीपर पुस्तके, अशा विविध पुस्तकांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जात आहे. गेल्या वर्षभरात अंदाजे साडेपाच हजार नवीन पुस्तके प्रकाशित झाली असून एका प्रकाशकाकडून महिनाभरात 8 ते 10 पुस्तकांची निर्मिती होत आहे. विशेष म्हणजे छापील पुस्तकांच्या वाचक संख्येतही 26 टक्क्यांनी वाढ झाली असून प्रामुख्याने 18 ते 40 वयोगटातील तरुणवर्ग वाचनाकडे वळला आहे. खर्‍या अर्थाने पुस्तकविश्व बहरले आहे.

राज्यभरात जवळपास साडेतीन हजारांहून अधिक प्रकाशन संस्था आहेत. त्यातील प्रमुख प्रकाशकांसह आता अगदी ग्रामीण भागातील प्रकाशकांकडूनही पुस्तक निर्मिती वाढली आहे. पुण्यात दररोज किमान तीन ते चार नव्या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नागपूर आदी जिल्ह्यांमध्येही पुस्तक निर्मिती वाढली आहे. राज्यभरात वर्षभरात अंदाजे 100 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल पुस्तकविश्वात होत असल्याचे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी सांगितले. मंगळवारी (दि. 23) साजरा होणार्‍या जागतिक पुस्तक दिनानिमित्त दै. 'पुढारी'ने याबद्दल आढावा घेतला.

बर्वे म्हणाले, अनेक नवोदित लेखक लिहिते झाल्यामुळे आणि त्यांच्याकडून मागणी वाढल्याने पुस्तकविश्वात रोज अनेक पुस्तकांची भर पडत आहे. गेल्या वर्षभरात अंदाजे साडेपाच हजार छापील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार म्हणाल्या, आता प्रकाशकांकडून पुस्तकांसाठी आधुनिक प्रिंटिंगचा पर्याय वापरला जात आहे. छपाईसाठी आता जलद गतीचे प्रिंटिंग मशिन उपलब्ध असल्याने काही दिवसांतच पुस्तके छापून दिली जात आहेत. तसेच पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे.

तरुणाईला काय आवडते?

गेल्या काही वर्षांत अनेक नव्या विषयांवर पुस्तके येत आहेत. फक्त कथा- कादंबर्‍या, कवितांसग्रह नाही; तर आता सामाजिक, राजकीय, माहितीपर, कला-संस्कृती, मोटिव्हेशनल, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा अशा विविध विषयांवर पुस्तके येत असून याकडे वाचकांचा कल आहे. त्यात ऐतिहासिक पुस्तकांना सर्वाधिक मागणी आहे. 18 ते 35 वयोगटातील तरुण विविध विषयांवरील छापील पुस्तके खरेदी करून वाचत आहेत. आत्मचरित्रे, चरित्रात्मक पुस्तके, ऐतिहासिक, सामाजिक, मोटिव्हेशनल अशा वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके तरुण वाचत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news