नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मोदी सरकारच्या वतीने निवडणूक समोर असताना महिला आरक्षण हा नवीन जुमला आहे. तारीख पे तारीख सुरू असून काँग्रेसचा विरोध होता असे सांगितले जात आहे. मुळात महिला आरक्षण देणे हे मोदी सरकारच्या नशिबी नाही, काँग्रेसच हे आरक्षण देईल, 15 लाख देऊ म्हणत गेल्यावेळी मत मागितले. नंतर चुनावी जुमला सांगितले असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि. 20) केला.
वडेट्टीवार म्हणाले, हे सरकार घाबरले आहे, 200 च्या आत जागा भाजपला मिळेल अशी शंका आहे, यात राहुल गांधींना लोकांचा वाढता पाठिंबा असल्यानं, उद्या निवडणुका लांबवायच्या, राष्ट्रपती राजवट लावण्याचे असे षडयंत्र सुरू आहे. खरेतर देशाला पहिली महिला मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती हे कॉंग्रेसने दिले, राज्यात भविष्यात पहिली महिला मुख्यमंत्री व्हावे यासंदर्भात छेडले असता ही बाब वरिष्ठ ठरवतील असा सावध पवित्रा घेतला. ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष, सरकार जबाबदार राहील.
ओबीसी आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. मी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून दोन दिवस झाले, आज पुन्हा बोलणार, उद्या उद्रेक झाला तर सांगू नका, आमच्या चंद्रपूरला उपोषणावर बसलेल्या कार्यकर्त्याला काही झाले तर सरकार जवाबदार राहील असेही वडेट्टीवार म्हणाले.
आज शेतकरी संकटात आहे. सोयाबीन हातचे गेले आहे, पिकांची परिस्थिती वाईट आहे, मुळात शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन नुकसानीचा अहवाल घेतला पाहिजे, लवकर तातडीने मदत कशी करता येईल यावर विचार झाला पाहिजे, शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी, नुकसानभरपाई मिळाली नाही असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.