तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले रेवंत रेड्डी कोण आहेत?

तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले रेवंत रेड्डी कोण आहेत?
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले रेवंत रेड्डी हे विद्यमान खासदार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के सी राव यांचा पराभव केला. मेहबूबनगर मधील कामारेड्डी मतदारसंघातून मुख्यमंत्री के सी राव यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे रेवंथ रेड्डी हे ५४ वर्षांचे आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून रेवंत रेड्डी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. काही काळ तेलगू देसम पार्टीतही त्यांनी काम केले. त्यानंतर काँग्रेस प्रवेश करत काँग्रेसला पहिल्यांदा तेलंगणा राज्यात सत्तेपर्यंत पोहोचवले.
२००७ साली पहिल्यांदा ते आंध्र प्रदेश विधानसभेत अपक्ष आमदार निवडून गेले. २००९ मध्ये तेलगू देसम पार्टीमधून लढत वरिष्ठ काँग्रेस नेते गुरुनाथ रेड्डी यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर तेलगू देसम पार्टीच्या वतीने रेवंथ रेड्डी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र २०१७ मध्ये तेलगू देसम पार्टीने पदावरून हटवल्यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्या केल्या २०१८ मध्ये कोडंगल विधानसभेतून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र २०१९ साली मलकाजगिरी लोकसभा मतदारसंघातून विजयी होत संसदेत पोहोचले. पुढे २०२१ ला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. तेव्हापासून त्यांनी तेलंगणा राज्य अक्षरशः पिंजून काढले. तेलंगणामध्ये काँग्रेसला पोषक वातावरण तयार करण्यात रेवंत रेड्डी यांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता चार राज्यांच्या निकालात तेलंगणा राज्य एक हाती जिंकल्यानंतर काँग्रेस रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्री बनवणार का हा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news