आयपीएल २०२१ ( IPL 2021 ) ची फायनल उद्या ( दि. १५ ) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना प्रदीर्घ चाललेल्या आयपीएलच्या १४ व्या हंगामाचा विजेता ठरवणार आहे. या दोन्ही संघांना त्या संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करुन फायनल पर्यंत आणले आहे. मात्र आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्या संघांनी विशेष अशी कामगिरी केलेली नाही. गुणतालिकेत त्यांना वरचे स्थान मिळवता आलेले नाही. मात्र त्या खेळाडूंनी सरस कामगिरी करत आयपीएलच्या हंगामात आपले असे विशेष स्थान निर्माण केले.
टी २० हा षटकार आणि चौकारांचा खेळ म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच स्पर्धेचे आयोजक याची रंजक आकडेवारी वेळोवेळी फ्लॅश करते. आयपीएल २०२१ ( IPL 2021 ) आता समाप्तीकडे पोहोचली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील आकडेवारी, विक्रम पाहणे रंजक ठरेल. अशीच एक रंजक आकडेवारी स्पर्धेतील षटकारांच्या बाबतीत समोर आलेली आहे.
षटकार मारणे हे कोण्या ऐऱ्या गैऱ्याचे काम नाही. सातत्याने षटकार मारण्यासाठी प्रचंड ताकद लागते. त्यामुळे षटकारांची आकडेवारी आली की आपल्या डोळ्यासमोर एखादा तगडा, धिप्पाड शरीरयष्टी असलेला खेळाडू डोळ्यासमोर येतो. मात्र आयपीएल २०२१ ( IPL 2021 ) मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा कारनामा ना धिप्पाड फलंदाजाने केला आहे ना हार्ड हिटर स्टाईलची फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाने. हा कारनामा केला आहे तो पंजाब किंग्जच्या केएल राहुलने. त्याने १३ सामन्यात ३० षटकार ठोकले आहेत.
या यादीत त्याच्या खालोखाल आहे तो चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड. त्याने राहुलपेक्षा दोन सामने जास्त म्हणजे १५ सामने खेळत २२ षटकार मारले आहेत. हे दोघेही सलामीवीर आहेत. जर ऋतुराजला राहुलपेक्षा जास्त षटकार मारायचे असतील तर फायनलमध्ये तब्बल ९ षटकार मारावे लागतील
हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १५ सामन्यात २१ षटकार ठोकले आहेत. मॅक्सवेल हा मधल्या फळीतील फलंदाज आहे. त्यामुळे त्याने केलेली ही कामगिरी विशेष आहे. या यादीत चौथ्या स्थानावर सीएसकेचा दुसरा सलामीवीर फाफ ड्युप्लेसिस आहे. त्याने १५ सामन्यात २० षटकार मारले आहेत. जर ड्युप्लेसिसने फालनलमध्ये दोन पेक्षा जास्त षटकार मारले आणि ऋतुराजला षटकार मारण्यात अपयश आले तर तो या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेईल.