वीस शहरांत सूर्य आग ओकू लागला; हवामान विभागाचा अलर्ट : उकाड्याने लोक हैराण

वीस शहरांत सूर्य आग ओकू लागला; हवामान विभागाचा अलर्ट : उकाड्याने लोक हैराण
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली / मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला उष्णतेच्या काहिलीने विळखा घातला असून एकूण 18 राज्यांतील 20 हून अधिक शहरांमध्ये पार्‍याने 45 ते 46 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी घेतली आहे. हवामान खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी काही दिवस तरी या असह्य उकाड्याच्या चक्रातून लोकांची सुटका होणे कठीण आहे. त्यामुळे प्रचंड उकाडा आणि अंगातून घामाच्या धारा अशी अवस्था झाली आहे.

हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम राजस्थान आणि मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर उर्वरित वायव्य भारत आणि मध्य भारतासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

देशातील बहुतांश भागांना उष्णतेचा तडाखा बसला आहे. 2 मे पर्यंत पूर्व, मध्य आणि वायव्य भारतात उष्णतेची पुन्हा लाट येण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट राहणार आहे.

देशातील बहुतांश भागातही पार्‍याने 45 अंश सेल्सिअसवर उसळी घेतली आहे. दिल्लीत पारा 46 च्या जवळ राहिला. दिल्लीने गेल्या बारा वर्षांतील उन्हाळ्याचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

तापमान दोन अंशांनी वाढण्याचा अंदाज 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तापमानात दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिवसाचे तापमान दोन अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे पश्चिम बंगाल सरकारने 2 मेपासून शाळांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबईतही घामाच्या धारा 

उष्ण आणि कोरड्या वार्‍यांमुळे मुंबईचे वातावरण आणखीच बिकट बनले आहे. एकीकडे मुंबईकर घामाने डबडबले आहेत तर दुसरीकडे पशू-पक्ष्यांचीही अवस्था दयनीय आहे. मुंबईत पारा 37 अंश सेल्सिअस एवढा राहिला. पुढील काही दिवस मुंबईत पारा 37 किंवा त्याहून अधिक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

कडक उन्हापासून असा करा बचाव… 

शक्यतो सुती कपडे वापरा. घराबाहेर जायचा प्रसंग आलाच तर चेहरा कापडाने पूर्ण झाका. टोपी आणि गॉगलचा वापर करा. भरपूर पाणी प्या. कलिंगड, टरबूज यासारख्या फळांचे सेवन करा. लिंबू सरबत, ताक यांचे प्रमाण आहारात वाढवा उन्हाळ्यापासून बचाव करण्याचे कांदा हेही एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक साधन आहे.

चंद्रपूर 46 पार; शंभर वर्षांत दुसर्‍यांदा उच्चांकी वाढ 

शुक्रवारी (29 एप्रिल) चंद्रपुरात तब्ब्ल 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शंभर वर्षांत ही दुसर्‍यांदा उच्चांकी नोंद असून 26 वर्षांनंतर इतका पारा चढला आहे. यापूर्वी 30 एप्रिल 1996 ला 46.4 सेल्सिअस तापमान नोंदविले होते. अकोला, अमरावती, बह्मपुरी, नागपूर, वर्धा आणि यवतमाळचा पाराही 45 च्या वर आहे.

गाडीच्या बोनेटवरच भाजल्या चपात्या 

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. काही राज्यांमध्ये 40 अंशापेक्षा जास्त तापमान झाले असल्याने अनेक लोक घराबाहेर जाण्याचे टाळत आहेत. एक महिला मात्र घराबाहेर जाऊन चक्क गाडीच्या बोनेटवर चपात्या भाजत असून या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ओडिशातील सोनपूर येथील हा व्हिडीओ आहे. ओडिशामध्ये सध्या 40 अंशपेक्षा जास्त तापमान आहे. सोनपूरमध्ये एवढे गरम तापमान आहे की, तुम्ही गाडीच्या बोनेटवर चपात्या भाजू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news