Mega Textile Park : कोल्हापूरला ‘मेगा टेक्स्टाईल पार्क’ उभारू

कोल्हापूर : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी शनिवारी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपस्थित दै. ‘पुढारी’चे समूह संपादक 
डॉ. योगेश जाधव, महेश राव. (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी शनिवारी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपस्थित दै. ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, महेश राव. (छाया : पप्पू अत्तार)

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कोल्हापुरात मेगा टेक्स्टाईल पार्क उभारा, अशी सूचना दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी वस्त्रोेद्योगमंत्री अस्लम शेख यांना केली. ही अत्यंत चांगली सूचना आहे. त्याबाबत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाऊन कोल्हापूरला मेगा टेक्स्टाईल पार्क उभारला जाईल, अशी ग्वाही शेख यांनी दिली. (Mega Textile Park)

शनिवारी दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यावर आलेले वस्त्रोद्योगमंत्री शेख यांनी दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची दै. 'पुढारी'च्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी दै. 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव उपस्थित होते. मंत्री शेख यांनी वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, मुंबई विकास आदी विषयांवर डॉ. जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

Mega Textile Park : इचलकरंजीची 'देशाचे मँचेस्टर' अशी ओळख

कोल्हापूरच्या इचलकरंजीची 'देशाचे मँचेस्टर' अशी ओळख आहे, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले, कोल्हापुरात मेगा टेक्स्टाईल पार्क सुरू करण्याची गरज आहे. कोल्हापुरात आपण असा पार्क सुरू करा.

यामुळे कोल्हापूरच्या वस्त्रोद्योगाला चालना मिळेल. सध्या 'केमिकल एमआयडीसी' आहेत, त्याच धर्तीवर 'टेक्स्टाईल एमआयडीसी' का काढत नाही? अशी एमआयडीसी सुरू केली तर वस्त्रोेद्योगासाठी हे दिशादर्शक काम होईल, असेही डॉ. जाधव यांनी सुचविले.

कोल्हापुरात मेगा टेक्स्टाईल पार्क ही अत्यंत योग्य सूचना असल्याचे सांगत मंत्री शेख म्हणाले की, आपण रविवारी इचलकरंजीला जाणार आहे. वस्त्रोद्योगाबाबत तेथील उद्योेजकांच्या असलेल्या सूचना ऐकून घेणार आहोत. यासाठीच आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहे.

आपण केलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगून त्यांनी यापुढेही सूचना आणि मार्गदर्शन करत राहा, असे आवर्जून स्पष्ट केले.

राज्याच्या मत्स्य उत्पादनात काहीशी घट

राज्याच्या मत्स्य उत्पादनात काहीशी घट झाली आहे. दरवर्षी होणारे पाच लाख टन उत्पादन सध्या चार लाख टनांपर्यंत खाली आले आहे. ते वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगत मंत्री शेख यांनी कोरोना काळात मुंबईचे पालकमंत्री म्हणून केलेल्या कामांची माहिती दिली.

नगरसेवक ते मंत्री, असा प्रवास केल्याने मुंबईची माहिती होती, त्याचा कोरोना काळात फायदा झाला. पीपीई कीट घालून स्वत: अनेक रुग्णालयांना भेटी दिल्या. रुग्णवाढीची नेमकी कारणे शोधून काढली आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

मुंबईसाठी यापूर्वी जिल्हा नियोजनमधून 100 कोटी रुपयांपर्यंतच निधी मिळत होता. आता तो 250 कोटी रुपयांपर्यंत वाढवून घेतला आहे. मुंबईला निधीची किती आवश्यकता आहे, हे पटवून दिल्यानेच हा निधी मिळत असल्याचे सांगून शेख यांनी यामुळे मुंबईत विकासकामांना गती मिळत असल्याचे स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news