पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशी (उत्तराखंड) येथील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. ऑगर मशीन योग्यरित्या काम करत असेल, तर आम्ही येत्या दोन ते अडीच दिवसांत कामगारां पर्यंत पोहोचू शकू, अशी माहिती केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. (Uttarakhand Tunnel Crash)
मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, या ऑपरेशनचे पहिले प्राधान्य कामगारांना जिवंत ठेवणे हे आहे. विशेष मशीन आणण्यासाठी बीआरओकडून रस्ते तयार केले जात आहेत. अनेक मशिन्स येथे दाखल झाल्या आहेत. दोन ऑगर मशीन सध्या बचाव कार्य करण्यासाठी कार्यरत आहेत. हिमालयातील भूभाग गुंतागुंतीचा असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. (Uttarakhand Tunnel Crash)
दरम्यान, उत्तराखंडमध्ये बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे रविवारी पहाटे पाचच्या सुमारास एका निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी सातत्याने बचावकार्य सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगद्यात अडथळा आणणारा सुमारे २१ मीटरचा स्लॅब हटवण्यात आला आहे. १९ मीटर रस्ता मोकळा करणे बाकी आहे. बचाव पथकाला सुरुवातीला ३० मीटरचा ढिगारा हटवणे शक्य होते, परंतु काही मातीचा ढिगारा पुन्हा कोसळला आहे. त्यामुळे बचाव पथक केवळ २१ मीटरचे अंतर पार करू शकले.
मिळालेल्या माहितीनुसार, ९०० मिमी व्यासाचे धातूचे पाइप सोमवारी रात्री उशिरा सिल्क्यारा बोगद्याच्या ठिकाणी आणण्यात आले. बचाव पथकाने ढिगाऱ्यातील पाईप्स दुरुस्त करण्यासाठी ड्रिलिंग प्रक्रिया सुरू केली, जेणेकरून अडकलेल्या कामगारांना धातूच्या पाईप्सद्वारे बाहेर काढता येईल. बचाव पथक ढिगाऱ्यामध्ये ड्रिल करण्यासाठी ऑगर मशीनचा वापर करत आहे.
हेही वाचा