पुढारी ऑनलाइन डेस्क : अयोध्येत राममंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. मात्र, मंदिराच्या बांधकामासाठी होणा-या खर्चात वाढ झाली आहे. राम मंदिर बांधण्यासाठी 1,800 कोटी रुपयांचा अंदाजे खर्च येणार आहे. या बजेटच्या अंदाजात वाढ होण्यास कारणीभूत घटकांमध्ये तांत्रिक बदल, मंदिर परिसराचा विस्तार आणि भूसंपादनाची वाढलेली किंमत यांचा समावेश आहे. मंदिराच्या तीन मजल्यांवर 'गर्भ गृह' आणि तळमजल्यावरील पाच 'मंडप' अशा बांधकामाचे काम जोरात सुरू आहे.
ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीत सांगितले की, तांत्रिक बदलांमुळे बांधकामाचा खर्च वाढला आहे. ते म्हणाले की, मंदिराचे आयुष्य 1,000 वर्षे असावे आणि नैसर्गिक आपत्तींसह आव्हानांना तोंड देण्याची क्षमता आहे याची खात्री करण्यासाठी बांधकाम कंपनीच्या सल्ल्यानुसार काम सुरू आहे.
मंदिराचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे आणि जानेवारी 2024 मध्ये मकर संक्रांती सणापर्यंत गर्भगृहात रामाची मूर्ती विराजमान होण्याची अपेक्षा आहे.
७० एकर परिसरात आणखी सात मंदिरे बांधली जातील, असेही राय म्हणाले. या मंदिरांमध्ये महर्षी वाल्मिकी, महर्षि वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, यासारख्या रामायण काळातील प्रमुख हिंदू द्रष्ट्यांच्या आणि मुख्य पात्रांच्या मूर्ती आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रस्टच्या काही सदस्यांनी बैठकीत सांगितले की, प्रभू रामाच्या बालस्वरूपाची मूर्ती शाळिग्राम खडकापासून बनवली जावी, तर काहींनी संगमरवरी किंवा लाकडाचा वापर करून बनवावी, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, समाजवादी पक्षाने (एसपी) वाढीव बजेटवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सपाचे प्रवक्ते अमीक जमई यांनी भूसंपादन प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला आणि त्यात भाजपचे अनेक नेते आणि आमदारांचा सहभाग असल्याचा दावा केला. निधी वाटपावर देखरेख ठेवण्यासाठी त्यांनी एससी-नियुक्त समितीचीही मागणी केली.
या दाव्यांचे खंडन करताना राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणाले की, मंदिर परिसराचा विस्तार, तीन मजली मंदिर योजना आणि सात मंदिरांचे बांधकाम यामुळे वाढीव अर्थसंकल्पीय अंदाजांना हातभार लागला आहे.
हे ही वाचा :