मुंबई : पुढारी वृत्तसेवा
कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी सिझन तीन या रिअॅलिटी शोचा विजेता होण्याचा बहुमान सांगलीच्या विशाल निकम याने मिळवला. कार्यक्रमाचे संचालक महेश मांजरेकर यांनी निकाल जाहीर केला. जय दुधाणे या कार्यक्रमात उपविजेता बनला.
शंभर दिवस एका घरात राहून निरनिराळी आव्हाने पेलणे असे या कार्यक्रमाचे स्वरूप असते. बिगबॉसच्या घरात या सिझनमध्ये एकूण 17 जणांनी प्रवेश केला होता. विशालसह जय दुधाणे, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि मिनल शाह हे पाच स्पर्धक शेवटपर्यंत टिकले होते. यात विशाल विजेतेपद मिळाले. त्याला ट्रॉफी आणि 20 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये घरातून बाहेर पडणार्या स्पर्धकांनी वेगवेगळ्या गाण्यांवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
विशाल हा मूळचा सांगली जिल्ह्यातील देवखिंडी येथील रहिवासी आहे. विशालने त्याच्या करिअरची सुरुवात मिथुन या सिनेमाद्वारे केली. त्या सिनेमामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर विशालने 'धुमस' या मराठी सिनेमातही काम केले; परंतु त्याला लोकप्रियता मिळाली ती 'दख्खनचा राजा जोतिबा' आणि 'जय भवानी, जय शिवाजी' या टीव्ही मालिकांमुळे.