पुढारी ऑनलाईन डेस्क : अजगर या सरपटणाऱ्या प्राण्याचं नाव जरी काढलं तरी, अंगावर काटा येतो. कारण, हा इतका क्रूर असतो की, त्याच्यापेक्षा आकाराने मोठ्या असणाऱ्या प्राण्यालाही सहज गिळतो किंवा वेटोळे घालून त्या प्राण्याला मारून टाकतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्यात अजगराने हरणाला वेटोळे घालून जखडून ठेवलेले आहे. मात्र, एका युवकाला हे चित्र दिसताच त्याने अजगराच्या तावडीतून हरणाला सोडवले आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, हरण्याच्या भोवती एका मोठ्या अजगराने विळखा घातलेला आहे. हा विळखा इतका जबरदस्त दिसतो आहे की, हरीण जीवाच्या आकांताने त्या अजगराच्या मगरमिठीतून सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. पण, त्याला साधी हालचालदेखील करता येत नाही. ताकदवान अजगराच्या तावडीतून सुटण्यासाठी चाललेली हरणाची चाललेली दिनवाणी हालचाल रस्त्याने जाण्याऱ्या एका तरुणाला दिसते.
तो तरूण तातडीने हातात एक मोठी झाडाची फांदी घेतो आणि त्या फांदीने अजगराच्या मिठीतून हरणाला सोडविण्याचा प्रयत्न करतो. पण, अजगर चिडतो आणि त्या तरुणाच्या अंगावर धावतो. अजगराची त्या तरुणाच्या दिशेने घेतलेली झेप पाहून अंगावर काटा येतो. तो तरुण साधव पवित्रा घेऊन हरणाला सोडविण्याचा प्रयत्न सुरूच ठेवतो. शेवटी अजगराच्या अंगावर फांदीचे फटके बसल्यामुळे अजगर हरणाला सोडतो आणि तेथून जवळच्या झुडपात पसार होतो. आणि अजगराच्या तावडीतून जीव वाचल्यानंतर हरीण तेथून पळून जाते.
हा संपूर्ण प्रकार एकाने आपल्या भ्रमणध्वनीवर चित्रीत करून ट्विटर या समाज माध्यमावर ट्विट केलेला आहे. सध्या हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. समाज माध्यमांवरील वापरकर्ते हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकीत झालेले आहेत. हा व्हिडिओ थायलंडचा आहे, असे सांगितले जात आहे. भुकेने व्याकूळ झालेला ताकदवान अजगर आणि त्याच्या मगरमिठीतून जिवाच्या आकांताने स्वतःची सोडवणूक करणारे हरीण, असा व्हिडिओ थायलंडमधील ड्युसिट प्राणी संग्रहालयाच्या सहाय्यक संचालकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.