मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते नैराश्यामुळे कधी जातीचे राजकारण करतात, तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबत करतात, असा टोला भारतीत जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी लगावला.
विनोद तावडे यांनी मंगळवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारच्या दहा वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला. दहा वर्षांच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेत मोदींच्या दहा वर्षांत महाराष्ट्राला करवाटपात 33 टक्के वाटा मिळाला. राज्याचे अनुदान 253 टक्क्यांनी वाढले. शिवाय, दोन वर्षात विकासकामांसाठी 11 हजार 711 कोटींचे बिनव्याजी कर्ज मिळाले. त्यासोबतच राज्यभरात पंतप्रधान आवास योजनेतून 27 लाख घरे बांधली. महाराष्ट्रात आयुष्मान भारत योजनेचे अडीच कोटी लाभार्थी आहेत. राज्यात जनधन योजनेत 3 कोटी 42 लाख खाती उघडली. मुद्रा योजनेत 2 लाख 33 हजार कोटींचे कर्जवाटप झाले. आठ लाख विक्रेत्यांना स्वनिधी योजनेत कर्ज मिळालक्क, तर 75 लाख जणांच्या घरात जलजीवन योजनेद्वारे पाणी आले. मोदी सरकारच्या काळात या सर्व योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचला, असे ते म्हणाले.
आपल्या भावी पिढीला काय मिळणार, याचा विचार करूनच मतदार मतदान करेल, असा विश्वासही तावडे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे यंदाची निवडणूक ही केवळ महायुतीचा खासदार निवडून देण्याची नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करण्याची असल्याचेही तावडे यांनी अधोरेखित केले.
संविधान नको या विधानाला राहुल गांधींची परवानगी
गोव्यातील काँग्रेस उमेदवाराने गोवा राज्यात भारतीय संविधान लागू करू नये अशी मागणी जाहीरपणे केली आहे. राहुल गांधी यांच्या अनुमतीनेच आपण ही मागणी करत असल्याचेही त्या उमेदवाराने स्पष्ट केले आहे. कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्यानेही असेच वक्तव्य केले होते. संविधानाविषयी काँग्रेसला आदर नसल्याचे यातून सिद्ध होते. भाजपविरोधात टीका करण्यासारखे काही उरले नसल्याने संविधान बदलासाठी भाजपला 400 पेक्षा अधिक जागा हव्या आहेत, असा अपप्रचार काँग्रेस नेते करत असल्याचा हल्लाबोल तावडे यांनी केला.