पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करून त्यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी भारतातील दिग्गज कुस्तीपटूंनी आज (दि. १८) दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन (Wrestlers Protest)केले. या आंदोलनात टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह देशातील अनेक कुस्तीपटूंनी सहभागी झाले होते.
कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला की, भारतीय कुस्ती महासंघ कुस्तीपटूंना त्रास देत आहे. जे लोक महासंघाशी संबंधित आहेत. त्यांना या खेळाबद्दल काहीही माहिती नाही. कुस्तीपटूंवर हुकूमशाही सुरू आहे. ती खपवून घेणार नाही. तर कुस्तीपटू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करून राजीनाम्याची मागणी (Wrestlers Protest) केली आहे.
विनेश फोगट यांनी सांगितले की, अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि महिला शिबिरातील अनेक प्रशिक्षकांनी कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले आहे. मला रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया च्या अधिकाऱ्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. महिला कुस्तीपटूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महिला खेळाडूंचे अध्यक्षांकडून शोषण होत आहे. खेळाडू खेळू शकत नाही म्हणून फेडरेशन जबरदस्तीने खेळाडूंवर बंदी घालत आहे. कोणत्याही खेळाडूला काही झाले, तर त्याला कुस्ती संघटनेचे अध्यक्ष जबाबदार असतील,असा इशाराही फोगट यांनी यावेळी दिला.
या आंदोलनात रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती सरिता मोर, संगीता फोगट, सत्यवर्त मलिक, जितेंद्र किन्हा आणि राष्ट्रकुल क्रीडा पदक विजेता सुमित मलिक आदीसह ३० कुस्तीपटू आणि प्रशिक्षक सुजित मान आणि फिजिओ आनंद दुबे सहभागी झाले आहेत.
दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेतली. ते म्हणाले की, महासंघाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावरून कळते की काही कुस्तीपटू आंदोलनास बसले आहेत. मी त्यांना त्यांच्या समस्या विचारण्यासाठी भेट घेतली. त्यांचे सर्व प्रश्न सोडवले जातील. प्रकरण काय आहे, हे मला अद्याप सांगण्यात आलेले नाही. आजपर्यंत असा कोणताही मुद्दा माझ्यासमोर किंवा महासंघासमोर मांडण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले.
ब्रिजभूषण शरण सिंग हे 2011 पासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांची सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
हेही वाचलंत का ?