नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना-ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे उद्या (दि. ९) रविवार आणि सोमवारी (दि. १०) विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूरला सकाळी विमानाने नागपुरात आल्यानंतर ते कारने यवतमाळ, दिग्रस, पोहरादेवी वाशिममार्गे अमरावती आणि पुन्हा नागपूरवरून मुंबई असा एकंदरीत अतिशय व्यस्त दौरा आहे. एकीकडे शनिवारी (दि. ८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार एकत्रितपणे गडचिरोली येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात आले. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा असून सेनेच्या लोकसभा मतदारसंघावर, बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे सोमवारी (दि. १०) सायंकाळी ६ वाजता नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान ठाकरे अमरावती येथून कारने परतताना प्रमोद मानमोडे यांच्या निर्मल फॅक्ट्री कोंढाली येथे कामगारांशी संवाद साधतील. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी अमरावती शहरात भावी पंतप्रधान म्हणून पोस्टर लागले आहेत. या बॅनरची जोरदार चर्चा आहे. ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी हे पोस्टर लावले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांच्या पक्षात बंडाळी झाल्यानंतर प्रथमच यवतमाळ जिल्ह्यात रविवारी (दि. ९ जुलै) उद्धव ठाकरे पोहोचतील. त्यानंतर पोहरादेवी येथे दर्शन घेऊन पालकमंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या दिग्रस येथे उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे ठाकरे गटामध्ये उत्साह संचारला आहे. सावधान गद्दारांनो तुमचा बाप दिग्रसला येत आहे, अशा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी मंत्री, खासदार यांना दिला आहे. नागपुरातील शिवसेना-ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या उपस्थितीत रविभवनला बैठकीत दौरा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.