मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आपल्याला सोडून काहीजण जात आहेत त्यांना खुशाल जाऊ द्या. त्यांच्यावरचा गद्दारीचा डाग पुसला जाणार नाही. पण, एखादा खडा इकडचा तिकडे केल्यावर शिवसेनेचा गड ढासळेल असे कुणाला वाटत असेल तर त्यांना शिवसेना कळलेली नाही. पक्षात मोठे झालेले गेले तरी ज्यांनी मोठे केले ते पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. शिवसेनेचा किल्ला अभेद्य आहे, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकरांच्या पक्षांतरावर भाष्य केले.
संबंधित बातम्या
गोरेगावातील शिवसेना शाखांच्या भेटीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावरही भाष्य केले.
उद्धव ठाकरे म्हणाले,शिवसेनेचा किल्ला अभेद्य आहे. इथे काल जी गर्दी होती ती आजही आहे, असे ठाकरे म्हणाले. यावेळी भाजपवर जहरी टीका करताना,भाजपमध्ये त्यांचा कोणी उरलेला नाही. त्यामुळे त्यांना बाहेरच्या लोकांना आयात करावे लागत आहेत. भाजपमध्ये आता सगळे आयाराम आहेत.
अस्सल भाजपवाल्यांनीच आता एकमेकांना प्रश्न केला पाहिजे की त्यांना नेमके कसले लोक हवे आहेत. आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडी आपल्यासोबत आहे. एका बाजूला देशभक्त आणि दुसर्या बाजूला द्वेषभक्त असा लढा आहे. जातपात बाजूला ठेवून देश हाच माझा धर्म आणि देश आणि लोकशाही रक्षणासाठी एकत्र यायला हवे,असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.