महाराष्ट्रात वखवखलेला आत्मा फिरतोय; उद्धव ठाकरे यांची नरेंद्र मोदींवर टीका

महाराष्ट्रात वखवखलेला आत्मा फिरतोय; उद्धव ठाकरे यांची नरेंद्र मोदींवर टीका
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ज्याप्रकारे भटकती आत्मा असते, तसाच वखवखलेला आत्माही असतो. गुजरातमधील एक वखवखलेला बुभूक्षित आत्मा सध्या महाराष्ट्रात सर्वत्र फिरत आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता केली; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पदाची प्रतिष्ठा घालवत असल्याची टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूर लोकसभा उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ वारजेमध्ये आयोजित सभेत ठाकरे आणि पवार बोलत होते.

ज्या महाराष्ट्रासाठी अनेकांनी स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता बलिदान देऊन हौतात्म्य पत्कारले, तोच महाराष्ट्र लुटण्याचे काम आज केले जात असून महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जात आहे. मोदी आणि भाजपची कीव येते. शिवसेनेने कठीण काळी मदत केली, ती शिवसेना आज संपवायला निघाले आहेत. आम्ही सोबत असताना मोदींना फार वेळा महाराष्ट्रात येण्याची गरज भासत नव्हती. आज त्यांना जिल्ह्याजिल्ह्यांत फिरावे लागत आहे. दहा वर्षांत काय काम केले, ते सांगायचे सोडून खालच्या पातळीवरील भाषा वापरली जात आहे. त्यांनी फोनवर शहाच्या मुलाला बीसीसीआयचे अध्यक्ष केले. भ्रष्टाचार कोणी केला आणि क्लीन चिट कोणाला मिळाली, हे जनतेला माहिती आहे. 'एक अकेला सबसे भारी, सोबत सारे भ्रष्टाचारी' असेही ठाकरे म्हणाले.

शरद पवार म्हणाले, देशाचा कारभार कुणाच्या हाती द्यायचा आणि गेल्या दहा वर्षांत ज्यांना सत्ता दिली, त्यांच्या कामाचा आढावा घेणारी निवडणूक आहे. पंतप्रधान या पदाला एक महत्त्व आहे. मात्र, मोदी त्या पदाचे महत्त्व कमी करीत आहेत. मोदी सत्तेचा गैरवापर कसा करतात, याची अनेक उदाहरणे देशासमोर आली आहेत. विरोधात बोलणार्‍यांना तुरुंगात टाकले जात आहे. छत्तीसगड, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. राहुल गांधी पदयात्रा काढून देशाचे दुखणे समजून घेत आहेत. त्यांच्यावर टीका केली जात आहे. पदयात्रा काढणे ही चुकीची गोष्ट नाही.

…त्यांना मोकळ्या झोळीने पाठवायचे आहे ः नाना पटोले

पुणे ः महाराष्ट्रातील कांद्याला बंदी, मात्र गुजरातमध्ये परवानगी. मग नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान आहेत का? महाराष्ट्राला बेरोजगार करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोकळी झोळी घेऊन आले होते. आता त्यांना पुन्हा तशीच मोकळी झोळी घेऊन माघारी पाठवायचे असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली. महाविकास आघाडीकडून वारजे येथे आयोजित केलेल्या उदेवारांच्या प्रचारसभेत पटोले बोलत होते. मोदी-शहा सरकारने लोकशाही सरकार संपविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महाराष्ट्राने एल्गार पुकारला असल्याचेही पटोले म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news