पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा अवमान होतो. तेव्हा मनाला वेदना होतात. हे विकृतीकरण थांबविणे गरजेचे आहे. यापुढे महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहाच्या कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (दि.२८) व्यक्त केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, खासदार भोसले यांनी राज्यपालांच्या विधानावर शिवप्रेमी संघटनांसह विविध संघटनांशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक कार्यक्रमात महाराजांची प्रतिमा लावली जाते. त्यांना अभिवादन केले जाते. त्यांचा आदर्श घेतला जातो. परंतु, अलिकडे राजकीय स्वार्थासाठी शिवरायांबद्दल विधाने केली जात आहेत. पुढच्या पिढीसमोर चुकीचा इतिहास ठेवला जात आहे. महाराजांचा अपमान करायचा असेल, तर महाराजांचे नाव कशासाठी घेता ? असा उद्विग्न सवाल करत उदयनराजेंना भावना अनावर झाल्या.
महाराजांची अवहेलना, अवमान होतो. तेव्हा मनाला वेदना होतात. हे विकृतीकरण थांबविणे गरजेचे आहे. अपमान करणाऱ्या विरोधात कारवाई होत नसेल, तर महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. पक्षश्रेष्ठींकडून अशा लोकांवर कारवाई होण्याची अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
हेही वाचलंत का ?