राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष दोघांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे देण्यात आला. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' हे नाव देण्यात आले होते. त्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पक्ष चिन्हावर ताबा कुणाचा यावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' हे नाव वापरू देण्याची मागणी शरद पवार गटाने केली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला सदर नाव वापरू द्यावे आणि एक आठवड्याच्या आत शरद पवार गटाला उपलब्ध चिन्हांपैकी चिन्ह देण्यात यावे, असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते. या निर्देशांचे पालन करत निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला 'तुतारी' हे निवडणूक चिन्ह दिले आहे. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'च्या वतीने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या चिन्हाची प्रसिद्धी करण्यात आली.