Bacchu Kadu : बेडूक कोण हे आगामी काळच ठरवेल! बच्चू कडू यांचा भाजपच्या नेत्यांना इशारा

Bacchu Kadu : बेडूक कोण हे आगामी काळच ठरवेल! बच्चू कडू यांचा भाजपच्या नेत्यांना इशारा
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजप व शिंदे गटातील वादात माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उडी घेतली आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यावर टीका केल्याप्रकरणी भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांना बच्चू कडू यांनी खडेबोल सुनावले आहेत. बेडूक कोण हे येणारा काळच ठरवेल, भाजपच्‍या नेत्‍यांनी अशा प्रकारची वक्‍तव्‍ये करणे टाळावे, अन्‍यथा आम्‍ही योग्‍य उत्तर देऊ, असा इशाराही कडूंनी या वेळी दिला आहे.
भाजपचे राज्‍यसभा सदस्‍य डॉ. अनिल बोंडे यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. त्‍याचे तीव्र पडसाद शिंदे गटात उमटले असून, माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू देखील आता या वादात उतरले आहेत. बच्‍चू कडू म्‍हणाले की, एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर भाजपच्‍या आमदारांना मंत्री म्‍हणून काम करण्‍याची संधीच मिळाली नसती. भाजपच्‍या नेत्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. त्‍यांनी मुख्‍यमंत्र्यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्‍यांनी केली.
दरम्यान, शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अद्यापही अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव आणि तळेगाव मोहना या दोन मंडळांना अतिवृष्टीचा निधी प्राप्त होऊ शकला नाही. आठ दिवसांत ही मदत मिळाली तर या दोन्ही मंडळातील १४ हजार शेतकऱ्यांना खरीप पेरणीला मोठी आर्थिक मदत होऊ शकते. यासाठी आमदार बच्चू कडू यांनी थेट मुंबईत सचिवालयात बेमुदत उपोषणाचा शासनाला इशारा दिला आहे. याबाबतचे पत्र 5 जून रोजी संबंधित मंत्रालयाला दिली आहे. त्यानुसार आमदार बच्चू कडू 15 जून रोजी  राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन मंत्रालयाच्या सचिवांचे दालनात आमरण उपोषण करणार आहेत. कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त लोकप्रतिनिधींनी आपल्या सरकारला दिलेला हा घरचा आहेरच  म्हणावा लागेल. मंत्री झालो म्हणून काय झाले शेतकरी प्रश्नी आपला लढा कायमच असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news