सातारा : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील वातावरण कुणी बिघडवलंय याचा विचार केला पाहिजे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर मजा येते. कोण जेलमध्ये जाऊन आला तर कोण जेलमध्ये आहे. लोकांना सर्व समजतं. तरीही हे एकमेकांची पाठ थोपटून घेत आहेत. एकेकाला दांडक्याने सडकून काढले पाहिजे. या लोकांनी पैसे खाल्ले आहेत. माझ्या हातात ईडी दिली तर पैसे खाणार्यांना दाखवतोच, असा इशारा भाजपचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिला.
सातारा पाटबंधारे विभाग आणि सातारा नगरपालिका यांच्या प्रयत्नांतून कास धरण उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. धरणाचे कोणते काम बाकी राहिले, ते कधी पूर्ण होईल, काही अडचणी आहेत का हे समजून घेवून कास धरण कामाची पाहणी करण्यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले कास येथे दौर्यावर होते. पाहणी झाल्यानंतर कास धरणाचे काम दि. 20 मे पर्यंत पूर्ण होईल असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. राज्यातील वातावरण चिघळलं असून लोकांचे प्रश्न मात्र प्रलंबित आहेत, असे विचारले असता खा. उदयनराजे भोसले म्हणाले, राज्यातील वातावरण कुणी बिघडवलं हे पाहणे गरजेचे आहे. 'टॉम अॅण्ड जेरी' हे माझं आवडतं चॅनेल आहे. सध्या हे चॅनेलसुध्दा पाहणं मी बंद केलं असून सध्या सुरु असलेले माकड चाळेच बघत असतो. मजा येते. कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला आत टाकतंय..बेसलेस.. कोण म्हणतं हा मुख्यमंत्री आहे का, तो मुख्यमंत्री आहे का, चांगलं आहे. काय बोलणार? कोल्हापूरला उत्कृष्ट सभा झाली. भरपूर लोक सभेला आले होते. वादच नाही. तुमची डिलीव्हरी दिली? झिरो..काहीच नाही. या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात ईडी द्या. मग या सगळ्यांना दाखवतोच. ईडी म्हणजे चेष्टा झाली आहे. पानपट्टीवर बिडी मिळते ना तशी त्या ईडीची अवस्था झाली आहे. ईडी आली.. ईडी आली.. एकेकाला ताब्यात घेवून चाप लावा.दांडक्याने सडकून काढले पाहिजेत, असे खळबळजनक वक्तव्यही त्यांनी केले.
खा. उदयनराजे म्हणाले, एका बाजूला फुटपाथवर लोक झोपत असताना या लोकांना दिसत नाहीत का? तरीही एकमेकांची पाठ थोपटायची? त्यांनी काही केलं नाही पण दोन वर्षे जेलमध्ये होते. यांनीही काही केलं नाही पण सध्या ते जेलमध्ये आहेत. कोण आहेत, कशा करता आत आहेत? लोकांना डोळे आहेत, कान आहेत. जनतेला सगळं समजतं. लोक हसतात. काय बोलणार? निवडणुका लागल्या तर कसे काय उभे राहणार? मी कुणाच्या नादी लागत नाही. माझं नाव कुणी घ्यायचंही नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पश्चिम) कार्यकारी अभियंता संजय सोनावणे, उरमोडी उपविभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अमर काशीद, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगर अभियंता दिलीप चिद्रे उपस्थित होते.