मराठी भाषेला योगदान देणारे थॉमस कँडी

मराठी भाषेला योगदान देणारे थॉमस कँडी
Published on
Updated on

प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन 

मराठी भाषेत विरामचिन्हे वापरण्याची पद्धत प्रथम थॉमस कँडी यांनीच सुरू केली. मराठी भाषेस आधुनिक वळण लावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. कँडी यांचे कार्य इतके मोठे आहे की, त्या काळाला 'कँडीयुग' म्हटले गेले आहे. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन. त्यानिमित्ताने…

महाराष्ट्रात 27 फेब—ुवारी हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ज्यांनी मराठी भाषेसाठी योगदान दिले आहे, त्यांचे स्मरण करणे आवश्यक ठरते. इंग्लंडमध्ये जन्माला येऊन 50 वर्षांपेक्षा जास्त काळ मराठीची कार्यसाधना करणार्‍या थॉमस कँडी यांचे कोशवाङ्मयाच्या व मराठी शालेय पुस्तकांच्या इतिहासात इतके मोठे कार्य आहे की, सन 1847 ते 1877 या 30 वर्षांच्या काळाला र्'कँडीयुग' म्हटले गेले आहे.

थॉमस कँडी व जॉर्ज कँडी या जुळ्या भावांचा जन्म 13 डिसेंबर 1904 रोजी इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मॅगडॅलेन कॉलेजमध्ये भारतीय भाषाविषयक अभ्यासाचे शिक्षण घेतले. शिक्षण झाल्यानंतर दोघांनीही 16 व्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी खात्यात क्वार्टरमास्टर (संदेश वाहक अधिकारी) म्हणून नोकरी स्वीकारली आणि त्यासाठी ते दोघेही मुंबईला आले. काही दिवसांनंतर जॉर्जने नोकरी सोडली व तो ख्रिस्ती धर्मोपदेशक बनला. त्यानेच मुंबईतील इंडो-बि—टिश इन्स्टिट्यूट ही शाळा स्थापन केली. त्यादरम्यान थॉमस कँडी यांनी मराठी भाषेची परीक्षा दिली. त्यानंतर 1832 साली त्यांची नेमणूक मराठी-इंग्रजी कोशाच्या कामात मोल्सवर्थचा मदतनीस म्हणून झाली. कोशरचनेचे काम सुरू असताना दोघेही बंधू आजारी पडले. त्यामुळे त्यांना स्वदेशी जावे लागले. जॉर्ज भारतात कधीच परत आले नाहीत. थॉमस मात्र लगेच परत आले आणि अखेरपर्यंत महाराष्ट्रातच राहिले.

1837 मध्ये कँडी यांची पुणे कॉलेजचे अधीक्षक व मराठी शाळांचे तपासनीस म्हणून नेमणूक करण्यात आली. 1847 मध्ये त्यांची मराठी भाषांतरकाराच्या जागेवर नेमणूक करण्यात आली. त्यांच्याच प्रेरणेने 1851 मध्ये पुण्याची पाठशाळा व इंग्रजी शाळा एकत्र केली गेली व ही जोडसंस्था न्यू पूना कॉलेज नावाने ओळखली जाऊ लागली. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कँडी यांनी 1856 पर्यंत काम पाहिले. कँडी यांच्या प्राचार्यपदाच्या कारकिर्दीत घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे त्यांना पुन्हा मराठी भाषांतरकाराच्या कमी पगाराच्या जागेवर जावे लागले. 1876 पर्यंत त्यांनी हे काम केले. या मुदतीत इतरांनी लिहिलेली शालेय व 'दक्षिणा प्राईज'साठी आलेली पुस्तके तपासण्याचे काम केले व स्वतः शालेय पुस्तके लिहिली. त्यातूनच मराठी लेखनपद्धतीला एकसूत्रीपणा आणण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. मराठीचे प्रमाणलेखन एकदा पक्के ठरवून तेच त्यांनी खंबीरपणे अमलात आणले.

इंग्रजी-मराठी शब्द कोशाव्यतिरिक्त कँडी यांनी 'नीतिबोधकथा'(1831), 'नवीन लिपिधारा', 'विरामचिन्हांची परिभाषा'(1850), 'वाचनपाठमाला'(1850), 'भाषणसांप्रदायिक वाक्ये'(1858), 'हिंदुस्थानचे वर्णन'(1860) इत्यादी पुस्तके लिहिली. 'द इंडियन पिनल कोड' व 'न्यू पिनल कोड'ची भाषांतरे सरकारने कँडीकडूनच करून घेतली.

'वाचनपाठमाला' आणि 'शाळांतील मुलांकरिता पुस्तके'(1 ते 6) ही क्रमिक पुस्तके कँडी यांनी लिहिली. या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. या पुस्तकांच्या माध्यमातून कँडी यांनी त्यांना अभिप्रेत असलेली लेखन- पद्धती प्रचारात आणली. बहुतेक सर्व शाळांतून ती कित्येक वर्षे गिरवली गेल्याने तीच पुढे कायम झाली. त्यांच्या या पद्धतीला सुरुवातीस फारच विरोध झाला. संस्कृत शब्द मुळाप्रमाणे लिहिणे, अनुस्वारांचा योग्य उपयोग, ठरावीक शब्द ठरावीक पद्धतीने लिहिणे, हे जे कँडी यांचे भाषाविषयक धोरण होते, ते शास्त्रीय विषयांवरील शालेय पुस्तकांतूनही अमलात आणण्याचा त्याचा आग्रह असे. मुलांच्या हाती सामान्य वाचनासाठी म्हणून द्यावयाची पुस्तके मेजर कँडी यांच्या काटेखोर नजरेखालून जात असत. त्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्या झाल्यावरच ती विद्याखात्याकडून मंजूर होत असत.

तपासणीसाठी आलेल्या पुस्तकांवर कँडी यांनी लिहिलेले अभिप्राय पाहिले की, त्यांनी सुचविलेल्या भाषा व व्याकरणविषयक सुधारणा, दुरुस्त्यांमुळे मराठी भाषेच्या घटनेमध्येच कसा बदल घडून आला, याची कल्पना येते. मराठीत चांगले ग्रंथकार झाले पाहिजेत, व्याकरणशुद्ध मराठी लिहिले गेले पाहिजे, यासाठी त्यांची सगळी धडपड असे. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळांच्या समारंभात ते उपस्थित असल्याचा उल्लेख सापडतो. मराठी भाषेत विरामचिन्हे वापरण्याची पद्धती प्रथम कँडी यांनीच सुरू केली. मराठी भाषेस आधुनिक वळण लावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. मराठी भाषेची सुमारे 50 वर्षे सेवा करणारे मेजर कँडी यांचे 26 फेब—ुवारी 1877 रोजी महाबळेश्वर येथे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news