परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : २२ जानेवारी रोजी आयोध्या येथे श्रीरामाची प्रतिष्ठापना होणार आहे. या प्रतिष्ठापनेसाठी प्राणप्रतिष्ठेचा विधी करणाऱ्या ब्रह्मवृंदांमध्ये प्रमुख विधीचार्य असलेल्या प.पु. द्रविडशास्त्री व प.पु.दीक्षित गुरुजी या दिग्गज वेदाचार्यांसोबत परळीतील 'घनपाठी' असलेल्या वेदमूर्ती शशांक कुलकर्णी निळेकर गुरुजी यांना खास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक सोहळ्यात परळीकरांना खूप मोठा बहुमान प्राप्त झाला असून अयोध्येतील मुख्य समारंभात मुख्य विधीचार्यांसोबत परळीतील हे वेदमूर्ती वेदोक्त मंत्रपठणाला उपस्थित राहणार आहेत.
भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात प्रतिष्ठापित होत आहेत. अयोध्येत आता श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. 15 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत अनेक विधी होतील. या संपूर्ण ऐतिहासिक क्षणात परळी वैजनाथला ही बहुमान प्राप्त झाला असुन परळीतील वेदशास्त्रसंपन्न 'घनपाठी' असलेले शशांक बाळासाहेब कुलकर्णी निळेकर (गुरुजी) यांना मुख्य कार्यक्रमात विधीचार्यांसमवेत उपस्थित राहण्याचे मानाचे निमंत्रण आलेले आहे.
दरम्यान आयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अतिशय मानाचा बहुमान प्राप्त करणारे वेदमूर्ती शशांक कुलकर्णी निळेकर गुरुजी कोण आहेत? व त्यांना या सोहळ्याचे मानाचे मुख्य विधीचे निमंत्रण कशामुळे प्राप्त झाले असेल? याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे शशांक कुलकर्णी निळेकर गुरुजी यांचा थोडक्यात अल्प परिचय असा आहे. श्री. शशांक बाळासाहेब कुलकर्णी निळेकर गुरुजी हे परळी येथील रहिवाशी असून शशांक निळेकर यांनी ढालेगाव, आळंदी, काशी अशा विविध ठिकाणी संपूर्ण वेदांचे शिक्षण घेतलेले आहे. वेदाच्या शिक्षणात चारी वेदांमध्ये निपुण असलेल्या विद्यार्थ्याला घनपाठी असे म्हटले जाते. चारी वेदांच्या श्रुतींचे मंत्र पठणात पारंगत असणारे घनपाठी विप्र म्हणून ओळखले जातात. त्याचप्रमाणे वेदाचा घनपाठ म्हणणारा; घन नांवाची वेदांची प्रक्रिया पठण करणारा (जटा, मला, शिखा, रेखा, ध्वज, दंड, रथ व घन अशा वेदपठणाच्या आठ प्रक्रिया आहेत.) वेदाध्ययनाच्या क्षेत्रात घनपाठी होणे अतिशय आवघड समजले जाते.तसेच घनपाठी विप्र मोजकेच बघायला मिळतात. असे वेदाचे घनपाठी असलेले परळीतील शशांक निळेकर गुरुजी आहेत. अयोध्येतील ऐतिहासिक सोहळ्यात मुख्य कार्यक्रमात त्यांना उपस्थित राहण्याचे बहुमानाचे निमंत्रण आलेले आहे.परळीकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या माध्यमातून परळी वैजनाथचे या ऐतिहासिक सोहळ्यात जगभरात प्रतिनिधित्व दिसणार आहे.