मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कोविडच्या काळापासून लोक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर अधिक लक्ष देत आहेत. यासाठी नियमितपणे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, ओमेगास, औषधी वनस्पती किंवा इतर पोषक गोळ्या घेत आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात 29 टक्के लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिन औषधे घेत असल्याचे समोर आले आहे. ( Medicines )
लोकल सर्कल नावाच्या खासगी संस्थेने महाराष्ट्रासह देशभरात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, ओमेगास, औषधी वनस्पती किंवा इतर पोषक गोळ्यांच्या सेवनाबाबत सर्वेक्षण केले आहे. राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये 7 हजार 142 लोकांनी सहभाग घेतला.
हे सर्वेक्षण तीन टप्प्यात करण्यात आले. पहिल्या टप्प्यात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, ओमेगास, औषधी वनस्पती किंवा इतर न्यूट्रास्युटिकल गोळ्यांचे नियमित सेवन पाहण्यात आले, ज्यामध्ये 1 हजार 888 सहभागींपैकी 14 टक्के लोकांनी सांगितले की, ते नियमित न्यूट्रास्युटिकल गोळ्या घेत आहेत. तर 35 टक्के लोकांनी नियमितपणे सेवन न केल्याचे मान्य केले.
याबाबत संस्थेचे संस्थापक सचिन तापडिया म्हणाले की, सरकारने जीवनसत्वसंबंधी औषधे अंमली पदार्थ नियंत्रण कायद्याखाली आणावी जेणेकरून त्यांचा गैरवापर कमी होईल. 21 टक्के लोक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेत आहेत. 1 हजार 711सहभागींपैकी 21 टक्के लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेत असल्याचे सांगितले.
1 हजार 720 प्रतिसादकर्त्यांपैकी 69 टक्के लोकांनी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतर रोग प्रतिकारशक्ती वाढवणार्या महत्त्वाच्या न्यूट्रास्युटिकल्सच्या किमती मर्यादित केल्यास प्रत्येकाला खरेदी करता येतील. या किमती सर्वाच्या आवाक्यात येतील. ( Medicines )