मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना बुधवारी महायुतीचे जागावाटपाचे चित्र अखेर स्पष्ट झाले. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी सर्वाधिक 28 जागा भाजपला गेल्या असून, त्याखालोखाल शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी 4 आणि रासप 1 जागा लढवत आहे.
दक्षिण मुंबईसह मुंबईतील तीन जागा आणि ठाणे, पालघर व नाशिक या सहा जागांवरून प्रामुख्याने रस्सीखेच सुरू होती. पालघरचा उमेदवार अधिकृतपणे जाहीर झाला नसला तरी विद्यमान खासदार राजेंद्र गावीत हेच भाजपचे उमेदवार असतील, असे उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जाहीर केल्याने ही जागा स्वत:कडे घेण्यात भाजप यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर ठाणे आणि नाशिक या दोन्ही जागा मिळवण्यात शिंदे गट यशस्वी ठरला आहे.
2019 च्या तुलनेत महायुतीत आणखी एक प्रमुख पक्ष सामील झाल्याने भाजपच्या जागांमध्ये घट होईल, असा अंदाज असताना प्रत्यक्षात 2019 च्या तुलनेत तीन अधिक जागा मिळविण्यात भाजप यशस्वी झाली.
भाजप – 28 : नंदुरबार (हिना गावित), धुळे (सुभाष भामरे), जळगाव (स्मिता वाघ), रावेर (रक्षा खडसे), अकोला (अनुप धोत्रे), अमरावती (नवनीत राणा), वर्धा (रामदास तडस), नागपूर (नितीन गडकरी), भंडारा-गोंदिया (सुनील मेंढे), गडचिरोली-चिमूर (अशोक नेते), चंद्रपूर (सुधीर मुनगंटीवार), नांदेड (प्रताप पाटील चिखलीकर), जालना (रावसाहेब दानवे), दिंडोरी (भारती पवार), भिवंडी (कपिल पाटील), मुंबई उत्तर (पीयुष गोयल), मुंबई पूर्व (मिहिर कोटेचा), मुंबई उत्तर मध्य (उज्ज्वल निकम), पुणे (मुरलीधर मोहोळ), अहमदनगर (सुजय विखे पाटील), बीड (पंकजा मुंडे), लातूर (सुधाकर श्रुंगारे), सोलापूर (राम सातपुते), माढा (रणजितसिंह नाईक निंबाळकर), सांगली (संजयकाका पाटील), सातारा (उदयनराजे भोसले), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (नारायण राणे), पालघर (उमेदवार जाहीर झालेला नाही).
शिवसेना -15 : बुलढाणा (प्रतापराव जाधव), रामटेक (राजू पारवे), यवतमाळ-वाशीम (राजश्री पाटील), हिंगोली (बाबुराव कदम कोहळीकर), छत्रपती संभाजीनगर (संदीपान भुमरे), नाशिक (हेमंत गोडसे), कल्याण (श्रीकांत शिंदे), ठाणे (नरेश म्हस्के), मुंबई उत्तर पश्चिम (रवींद्र वायकर), मुंबई दक्षिण मध्य (राहुल शेवाळे), मुंबई दक्षिण (यामिनी जाधव), मावळ (श्रीरंग बारणे), शिर्डी (सदाशिव लोखंडे), कोल्हापूर (संजय मंडलिक), हातकणंगले (धैर्यशील माने)
राष्ट्रवादी 4 : बारामती (सुनेत्रा पवार), शिरुर (शिवाजीराव आढळराव पाटील), धाराशिव (अर्चना पाटील), रायगड (सुनिल तटकरे).
रासप 1 : परभणी (महादेव जानकर)
महायुतीच्या जागावाटपासाठी झालेल्या वाटाघाटींमध्ये शेवटी भाजपला तडजोड करून शिंदे गटाला काही मोक्याच्या जागा सोडाव्या लागल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात आमदारांचे संख्याबळ कमी असूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 21 जागा पटकावल्या. त्या तुलनेत महायुतीमध्ये शिंदे गटाला सहा जागा कमी मिळाल्या आहेत.
शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्याकडे केवळ 5 खासदार उरले होते व शिंदे गटाकडे त्यांच्यापेक्षा 8 अधिक असे 13 खासदार गेले होते. मात्र जागा वाटपात महाविकास आघाडीत शिंदे गटापेक्षा 6 अधिक जागा मिळविण्यात ठाकरे यशस्वी झाले. त्यामुळे राज्यात 15 जागांवर शिंदे गटाचे तर 21 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार पहायला मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाचे 10 जागांवर, तर अजित पवार गटाच्या चिन्हावर केवळ 4 जागांवर उमेदवार पहायला मिळतील.
किमान 32 जागांवर तरी भाजप लढेल, असे दावे करून विविध सर्वेक्षणांच्या नावाखाली शिंदे गटाच्या जागा काढून घेण्याचा प्रयत्न पहिले दोन टप्पे होईपर्यंत भाजपने केला. मात्र अखेरचा टप्पा येईपर्यंत हीच भाजप शिंदे गटासमोर नरमाईची भूमिका घेताना दिसली. नाशिक येथून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करणार्या व ही जागा आपल्यालाच मिळावी म्हणून अडून बसलेल्या भाजपने अचानक याही जागेवरील दावा सोडला व गोडसेंबद्दलचा त्यांचा विरोधही मावळला. ठाण्याच्या जागेवरही अखेरच्या क्षणापर्यंत दावेदारी करणार्या व ही जागा संजीव नाईकांना देण्याची योजना आखणार्या भाजपला ठाण्यातही तडजोड करावी लागली. शिवसेना (शिंदे) गटाने सुचविलेले नरेश म्हस्के यांचे नाव विजयी होण्याइतके प्रबळ नाही, असे म्हणणार्या भाजपला याही भूमिकेत अखेर बदल करावा लागल्याचे दिसत आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवरही अनेक महिने दावे करून व प्रत्यक्ष निवडणुकीची तयारी करूनही येथेही भाजपला नमते घ्यावे लागले.
भाजपला 2019 पेक्षा तीन अधिक जागा
भाजपने मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा तीन अधिकच्या जागा आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले तर शिवसेनेला 2019 च्या तुलनेत 8 जागा कमी मिळाल्या आहेत. 2019 साली भाजपने 25 जागा लढून 23 जागांवर तर शिवसेनेने 23 जागा लढून 18 जागांवर विजय मिळविला होता. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 13 खासदार शिंदेंसोबत आले. सोबत आलेल्या खासदारांच्या तुलनेत 2 अधिक जागा शिवसेनेने मिळविल्या. विशेष म्हणजे प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ठाणे व नाशिकमधील जागा आपल्या पदरात पाडून घेत शिंदे गटाने यशस्वी वाटाघाटी केल्याचे दाखवून दिले.