शोध सुखाचा! : कृतज्ञतेची शक्ती

 कृतज्ञतेची शक्ती
कृतज्ञतेची शक्ती

आज आत्ता हे वाचत असताना विचार करा की, तुमच्यापैकी कुणाकुणाला कृतज्ञ राहायला आवडतं? किंवा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत आलेला आहात? यावर बरेचजण म्हणतील की, आम्हाला माहीत आहे की, एखाद्याने आपले काही काम केले तर त्याचे आभार मानायचे असतात. त्याला 'थँक्यू' म्हणायचं असतं. ते तर आम्ही दिवसभरात बरेच वेळा म्हणत असतो. हे तर बेसिक मॅनर्स आहेत!

अगदी बरोबर. आभार मानणे, कृतज्ञ राहणे, आणि ती व्यक्त करणे हे बेसिक मॅनर्स आहेत. पण हे तुम्ही स्वत:च्या स्थितीबद्दल करता का? या प्रश्नाचे उत्तर बहुतांश लोक 'नाही' असे देतील. कारण स्वत:च्या आयुष्याबद्दल कृतज्ञ राहणं फार कमी लोकांना जमतं. बरेचदा ते माहितीही नसतं. म्हणून केलं जात नाही. म्हणून आता याबाबत विचार सुरू करा.

सर्वप्रथम तुम्ही कोण आहात, कसे आहात, तुमच्या आयुष्यात काय काय समस्या आहेत, याकडे बघण्याचा द़ृष्टिकोन बदला. समस्यांशिवाय माणूसच असत नाही. 'जगी सर्व सुखी असा कोण आहे', असे समर्थ रामदासांनी उगाच म्हटलेले नाही. प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेत. शिवाय प्रत्येकजण त्याविषयी तक्रार, कुरकूर करत असतो. कुणाकडे पैसा आहे, पण आरोग्य नसतं. कुणी निरोगी आहे, पण गरीब आहे.

कुणाचे घरचे नातेसंबंध बिघडलेत. कुणाची कोर्टकचेरी सुरू आहे. एक ना दोन… असंख्य समस्यांनी माणसाला वेढून टाकलेलं आहे. आणि फार कमी लोक आनंदी दिसतात. बाकी सगळे त्रस्त आणि वैतागलेले असतात. द्वेष, मत्सर, राग, अस्वस्थता यांनी ग्रस्त असतात. या परिस्थितीत कोण कसा आनंदी राहू शकेल? हा सवाल बिनतोड आहे असंच प्रत्येकाला वाटेल. पण त्यावरही एक उपाय आहे. अगदी साधा, सोपा उपाय. तो म्हणजे तुम्ही जिथे जसे आहात, त्याबद्दल कृतज्ञ राहायला सुरू करा.

माणसाचा स्वभावच असा असतो की, आपल्याकडे काय नाही किंवा काय हवे आहे, याच विचारात तो सतत गुंतलेला असतो. आसपास, सर्वांकडे बघताना नकळत त्यांच्याशी तुलना करत दु:खी होत राहतो. पण तुम्ही स्वत:कडे एकदा नीट पाहा आणि मनापासून विचार करून 'नाही'ची यादी बाजूला ठेवून काय काय 'आहे' याची यादी तयार करायला घ्या. अगदी पहिल्यांदा एक किंवा दोनच गोष्टी आठवतील. मग नीट विचार करून त्या यादीत काय काय वाढवता येईल याचा विचार सुरू करा. दुसर्‍या वेळी अजून एखादी गोष्ट दिसले.

पैसा, आरोग्य, नातेसंबंध या सारख्या मोठ्या गोष्टींचा विचार कराच; पण त्याही पलीकडे जाऊन दिवसभरात कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या, घडत आलेल्या आहेत, याबद्दल विचार करा. मग हळूहळू 'नाही'च्या यादीपेक्षा 'आहे'ची यादी वाढताना दिसेल. हे सगळं एका प्रयत्नात जमेल असं नाही. पण तसा विचार करायची सवय लावून घ्या. कोणतीही जुनी सवय सोडून नवी सवय लावायला 21 दिवस लागतात, असं म्हणतात. त्यामुळे हे प्रयत्न किमान इतके दिवस प्रामणिकपणे करायला हवेत. सकाळी जेव्हा तुम्ही उठता, तेव्हा दिवसभरात पुढे काय काय कामं आहेत याचाच विचार मनात प्रथम येतो.

अर्थात ते साहजिक आहे. मात्र तुमच्या लहानपणीची एक गोष्ट तुम्हाला आठवते का ते पाहा. घरातली जुनी माणसं, विशेषत: आजी-आजोबा असतील तर ते उठल्याबरोबर दोन्ही तळहात आपल्या समोर धरून 'कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती' हा श्लोक म्हणत आणि अंथरुणातून उठताना भूमीला वंदन करत. हे वागणे ही कृतज्ञताच आहे. सकाळी प्रथम ईश्वराला, भूमीला तसेच आपले हात जे कर्तव्य पार पाडण्याला सज्ज आहेत, त्यांना वंदन करून दिवसाची सुरुवात करणे ही कृतज्ञतेची सुरुवात आहे. रात्रभर तुम्ही झोपलेले असताना शरीरांतर्गत अवयव जागे राहून आपापली कर्तव्ये पार पाडतात. तुम्ही शांत झोपता; तेव्हा शरीराला विश्रांती मिळून त्याची झीज भरून यायला मदत होते. ही यंत्रणा ज्या ऊर्जेकडून चालवली जाते, तिच्याबद्दल कृतज्ञ राहण्यासाठी प्रथम 'आभारी आहे… आभारी आहे…' असे शब्द मनापासून म्हणा.

यानंतर तुम्ही जी जी कामे करता त्या प्रत्येक कामासाठी तुमचे शरीर, मन आणि आसपासची माणसे, वस्तू या सर्वांचा तुम्हाला उपयोग होत असतो. त्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञता बाळगा आणि 'आभारी आहे' म्हणून ती व्यक्त करत राहा.

मध्यंतरी मी पाण्याबद्दलची एक पोस्ट वाचली. तुम्हीही ती वाचली असेल. जेव्हा जेव्हा आपण पाणी पितो, त्यावेळी ते भांडे किंवा ग्लास काही क्षण हातात धरून त्या पाण्याविषयी कृतज्ञता मनात आणायची आणि हे पाणी शरीरात जाऊन योग्य ते परिणाम घडवून आणणार असल्याची श्रद्धा बाळगून मग ते पाणी प्यायचे. आपण त्या भांंड्यावर हात ठेवून ज्या भावना मनात आणतो, तसे त्या पाण्याच्या संरचनेत बदल घडवून आणतात आणि तसे परिणाम दिसतात, असे त्यात म्हटले होते. शास्त्रीयद़ृष्ट्या ही गोष्ट खरी किंवा खोटी असा विचार न करता, आपणही असे केले तर काय बिघडणार आहे? कारण पाणी म्हणजे जीवन असे आपण मानतोच. मग त्याबद्दल कृतज्ञ असायलाच हवे.

दुसरी शरीराची यंत्रणा चालवणारी गोष्ट किंवा शरीराच्या गाडीचे इंधन म्हणूया, ते म्हणजे अन्न, अन्न ग्रहण ही निव्वळ क्षुधाशांती नसून शरीराच्या सर्व अवयवांचे पोषण करणारी व्यवस्था आहे, यात दुमत नाही. पूर्वी जेवण करण्याआधी 'वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे' असा श्लोक म्हणून अन्नाला नमस्कार करून जेवायला सुरुवात केली जायची. आज प्रत्येकजण इतका व्यग्र होऊन गेलाय की निव्वळ 'उदर भरण', तेही मिळेल तसे केले जाते.

टीव्हीसमोर बसून जेवणे ही तर अंगात भिनून गेलेली वाईट सवय आहे. कुणीही, कुठेही, कसाही जेवतो. आजचे जीवन धावपळीचे आहे, यात संशय नाही. पण जे अन्न तुमची प्रकृती घडण्या-बिघडण्याचे कारण ठरणार आहे, त्याकडे थोडे लक्षपूर्वक पाहायला हवे. यासाठी एक छोटीशी गोष्ट करता येईल.

ज्यावेळी आपल्यासमोर अन्न येईल, तेव्हा काही क्षण मनोमन किंवा शक्य असेल तर हात जोडून त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. असे अन्नग्रहण निश्चितपणे शरीरावर, मनावर चांगलेच संस्कार करते. प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता बाळगायची सवय लावून घेतलीत तर पुढे काय काय उत्तम अनुभव येतील हे तुम्हीच दुसर्‍यांना सांगू लागाल. शिवाय समाधान वाढेल ते वेगळेच.

तात्पर्य काय, आपल्या अवती भवती असलेल्या 'तुम्हाला जिवंत ठेवणार्‍या' सर्व सजीव-निर्जीव गोष्टींचे आभार मानायला सुरू करा. मनापासून श्रद्धेने हे सर्व करा. 'जे पिंडी ते ब्रह्मांडी' या न्यायाने तुम्ही ज्या ज्याबद्दल कृतज्ञ आहात ते सगळे भरभरून तुमच्याकडे चालत येईल.

पैसा, नातेसंबंध, माणसे या सर्वांबद्दल हा प्रयोग मन:पूर्वक करा आणि मग तुम्हालाच लक्षात येईल की, मनातला त्रास, वैताग, अस्वस्थता कमी होते आहे. याचे कारण म्हणजे 'नाही'कडून 'आहे'कडे वळलेले तुमचे मन. कृतज्ञतेनंतर आता प्रत्येक हव्या त्या गोष्टीसाठी नेमके काय करायचे, ते पाहू पुढील भागात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news