मान्सून रेंगाळला; काय करावे?

मान्सून रेंगाळला; काय करावे?

पेरणी चांगली होण्यासाठी 65 मिलिमीटरपर्यंत ओलावा जमिनीमध्ये असावा लागतो. म्हणजे दोन ते तीन फूट खोल माती भिजलेली असली पाहिजे, तरच ती पेरणी करण्याला अर्थ आहे. कमी ओलीवर पेरण्या केल्या आणि नंतर पावसाने दडी मारली, उघडीप पडली की दुबार पेरणीचे संकट येते आणि शेतकरी संकटात येतात. म्हणूनच शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूनचे आगमन आणि मान्सूनची प्रगती अशा प्रकारे साधारणतः मान्सूनचे अवलोकन केले जाते. यंदाच्या वर्षी अंदमानमध्ये मान्सूनचं आगमन वेळेपूर्वी झालं आणि पुढं केरळमध्येही मान्सून वेळेपूर्वी आला.

परंतु त्यापुढील टप्प्यावर मान्सूनची वाटचाल रेंगाळली. सामान्यतः कर्नाटक, तळकोकण, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राचा भाग यामध्ये मान्सूनची प्रगती होत असते. पण यावर्षी मान्सूनच्या प्रगतीत अडथळे येतील आणि जूनमध्ये मान्सूनचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज 1 जून रोजी दिला होता. आमच्या मान्सून मॉडेलनुसार जून महिन्यातील पावसातला खंड सांगता येऊ शकतो. हे मॉडेल लांबपल्ल्याचा स्थानिक ठिकाणचा पावसाचा अंदाज देणारे असून त्याचे पेटंट आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, मराठवाड्यातील जालना, परभणी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, राहुरी, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, पाडेगाव, कराड, कोल्हापूर आणि कोकणातील दापोली अशा 15 स्थानिक ठिकाणच्या जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाचा अंदाज या मॉडेलद्वारे सांगितला जातो. कारण, पावसामध्ये प्रचंड विविधता असते.

कोकणामध्ये सरासरी 3300 मिलिमीटरहून अधिक पाऊस पडतो; तर महाबळेश्वरला सुमारे 5000 मिलिमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. तेथून 60 ते 80 किलोमीटर अंतरावर असणार्‍या पुण्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 565 मिलिमीटर पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये नऊ हवामान विभाग आहेत. या विभागांमधील पावसाचे प्रमाणही वेगळे आहे. त्यामुळे सर्वसाधारण अंदाज वर्तवल्यास त्यातून स्थानिक ठिकाणच्या पावसाचे अवलोकन होत नाही. परंतु आपल्याकडे सामान्य लोक सरासरीइतका पाऊस होईल असे म्हटले की आनंदी होतात. वास्तविक, महाराष्ट्रातला धुळ्याचा काही भाग, नंदुरबारचा काही भाग, नाशिकचा काही भाग आणि संपूर्ण नगर जिल्हा, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, सांगली-सातारा जिल्ह्यांचे पूर्व भाग, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबादचा काही भाग हे 12 जिल्हे दुष्काळी जिल्हे म्हणून ओळखले जातात. 1972 मध्ये 85 तालुके दुष्काळी होते. पण 2012, 2015 आणि 2018 च्या दुष्काळामध्ये ही संख्या वाढत गेली आणि आज ती 133 वर पोहोचली आहे.

मान्सूनचे प्रमाण आणि त्याचे वितरण याच्याशी महाराष्ट्राचीच नव्हे सबंध देशाची शेतीव्यवस्था जोडली गेलेली आहे. आज हवामान बदलांमुळे मान्सूनचा लहरीपणा वाढला आहे. पावसाचे वितरण असमान पद्धतीने होत आहे. पावसातील खंड वाढत चालले आहेत. कमी काळात अधिक पाऊस पडण्याच्या घटना वाढत आहेत. या सर्वांच्या मुळाशी जागतिक तापमानवाढ आहे. 2030 सालापर्यंत पावसाच्या वितरणातील फरकामध्ये आणखी वाढ होत जाणार आहे. यावर्षी आमच्या मॉडेलमध्ये जून महिन्यात पावसात खंड पडेल आणि सरासरीइतका पाऊस पडणे शक्य नाही हे दिसून आले होते. त्यामुळे त्याचा परिणाम पेरण्यांवर, शेतीवर आणि पिण्याच्या पाण्यावर होणार आहे. एक जूनला अंदाज देतानाच याची कल्पना दिली होती. वर उल्लेख केलेल्या 15 स्थानकांमध्ये मार्च-एप्रिल महिन्यात वार्‍याचा वेग 1 ते 2 किलोमीटर प्रतितास इतका आढळला होता. प्रत्यक्षात तो सात ते आठ किलोमीटर असायला हवा होता. वार्‍याचा वेग कमी असल्यास मान्सूनचा रस्ता तयार होण्यास अडथळे निर्माण होतात. आपल्या भूपृष्ठावर हवेचे दाब अधिक राहिले तर मान्सून पुढे सरकत नाही. त्याला वेळ लागतो. त्यामुळेच जून महिन्यात पाऊस कमी राहील, खंड पडतील असा अंदाज वर्तवला होता आणि आज तशीच परिस्थिती दिसून येत आहे.

यंदा महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात 100 टक्के कमी पाऊस झाला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर, नांदेड, भंडारा आणि मुंबईमधील काही भागाचा यामध्ये समावेश आहे. 8 जूनपर्यंत रायगड, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वाशिम आणि बीड अशा 16 जिल्ह्यांमध्ये 90 ते 99 टक्के कमी पाऊस झाला आहे. पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर, हिंगोली, यवतमाळ, लातूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यांत 80 ते 90 टक्के कमी पाऊस झाला आहे. सांगली आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत 36 ते 54 टक्के कमी पाऊस झाला आहे. एकूण सर्वच महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जून महिन्यातील पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. संपूर्ण भारताचा विचार केल्यास महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत 59 टक्के कमी पाऊस झाला आहे.

या सर्व परिस्थितीचा खरीप हंगामावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. पेरणी चांगली होण्यासाठी 65 मिलिमीटरपर्यंत ओलावा जमिनीमध्ये असावा लागतो. म्हणजे दोन ते तीन फूट खोल माती भिजलेली असली पाहिजे, तरच ती पेरणी करण्याला अर्थ आहे. कमी ओलीवर पेरण्या केल्या आणि नंतर पावसाने दडी मारली, उघडीप पडली की दुबार पेरणीचे संकट येते आणि शेतकरी संकटात येतात. म्हणूनच अंदाज वर्तवताना तात्काळ पेरण्या न करण्याचा सल्ला दिला होता. कारण बरेचदा थोडा पाऊस सुरू झाला की शेतकरी पेरण्या करतात. पण नंतर बी मोडवते, थोडसे उगवते आणि पाणी न मिळाल्याने मरून जाते. दुबार पेरणीमुळे शेतकर्‍यांना डबल खर्च करावा लागतो. आमच्या अंदाजानुसार 15 जुलैनंतर पावसाचे प्रमाण चांगले राहील. 15 ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहू शकतो. त्यानुसार आपल्या शेतीचे नियोजन शेतकर्‍यांनी केले पाहिजे.

अलीकडील काळात कपाशीचे दर वाढल्यामुळे महाराष्ट्रात कापसाचा पेरा वाढतो आहे. परंतु ते करत असताना भारी जमिनीमध्ये, बागायत शेतीमध्येच कपाशीचे पीक घेतले पाहिजे आणि हलक्या व मुरमाड जमिनीत इतर पिके घेतली पाहिजेत. कारण या जमिनींची ओल साठवून ठेवण्याची क्षमता कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दुष्काळी पट्ट्यातील 12 जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस पडतो. मी 84 तालुक्यांचा अभ्यास केला असता असे दिसून आले की 9 ते 10 दिवसांतच हा पाऊस होतो. अशा वेळी रब्बी ज्वारीची लागवड केली पाहिजे. खरिपात पाऊस चांगला झाल्यास बाजरी आणि तूर हे आंतरपीक पद्धतीने लावले पाहिजे. पीक पद्धतीत हवामानानुसार बदल करणे आवश्यक आहे. त्यामध्ये फळबागांच्या लागवडीकडेही लक्ष द्यायला हवे. काही क्षेत्र पॉलीहाऊस पद्धतीने तयार करणेही गरजेचे आहे. शेतकर्‍याकडे 10-15 गुंठे पॉलीहाऊस असेल तर त्यामध्ये टोमॅटो, ढोबळी मिरच्या यासारख्या फळभाज्यांची लागवड करता येईल. याखेरीज फूल शेतीही काही प्रमाणात करता येणे शक्य आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर हवामानावर आधारित कृषी व्यवस्थापन ही संकल्पना आपण राबवली पाहिजे. त्यासाठी तज्ज्ञांची फळी आपल्याकडे असली पाहिजे. दुसरीकडे हवामानाच्या अंदाजांची अचूकतही वाढवली पाहिजे. हवामान विभागाने पाऊस येतोय म्हणून सांगितल्यानंतर शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसतो; पण पाऊस पडला नाही की त्याची निराशा होते. यासाठी स्थानिक ठिकाणचा पावसाचा अंदाज देणारी व्यवस्था विकसित केली गेली पाहिजे आणि त्याच्या अचूकतेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. किती पाऊस होईल आणि कोणत्या भागात पाऊस पडेल हे सांगितले गेले पाहिजे.

हवामान बदलांमुळे शेतीमधले उत्पादन जर नीट येऊ शकले नाही तर मोठ्या समस्यांना जगातील लोकसंख्येला तोंड द्यावे लागेल. भविष्यात पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत राहिल्यास अन्नधान्य, दुग्धोत्पादन या जगण्याशी संबंधित गरजांवर प्रचंड प्रतिकूल परिणाम होण्याच्या शक्यता आहेत. त्याला पाऊस आणि पाणी हेच कारण असेल. म्हणूनच पाऊस चांगल पडावा यासाठी वृक्षलागवडीवर भर दिला पाहिजे. यामध्ये सामूहिक लोकसहभाग वाढवला पाहिजे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news