पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता रजनीकांत ( Rajinikanth ) यांच्या वाढदिवसानिमित्ताने आगामी 'थलाइवर १७०' चित्रपटाच्या नविन नावाची (शीर्षक) निर्मात्यांनी घोषणा केली आहे. टीजे ज्ञानवेल लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव 'वेट्टैयन' (Vettaiyan) ठेवण्यात आले आहे. प्रॉडक्शन बॅनर लायका प्रोडक्शनने रजनीकांत यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटातील शीर्षकाचा एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे.
संबंधित बातम्या
चित्रपटाच्या शेअर झालेल्या व्हिडिओत साऊथचा सुपरस्टार रजनीकांत ( Rajinikanth ) हे त्याच्या स्टाईलमध्ये डोळ्यावर चष्मा परिधान करताना दिसतात. यावेळी ते खास करून म्हणतात की, "जेव्हा शिकार चालू असते, तेव्हाच शिकार पडली पाहिजे." याशिवाय यात खुर्चीत बसून पुस्तक वाचताना, खोलीतून बाहेर येताना, कमरेवर हात ठेवून फिरताना, हातात काठी फिरवताना, बदुंक घेवून फायरिंग करताना रजनीकांत हे हटके अंदाजात दिसत आहेत. हा टिझर अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केला आहे. तर शुभा यांनी टिझर लिहिलेला आणि गायलेला एक छोटा रॅप आहे. तमिळ शब्द 'Vettaiyan' चा इंग्रजीत अर्थ शिकारी असा होतो.
आगामी 'थलाइवर १७०' या चित्रपटात रजनीकांत ३० वर्षांनंतर पुन्हा बॉलिवूड अभिनेता बिंग बी अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहेत. हे दोन्ही सुपरस्टार शेवटचे १९९१ च्या अॅक्शन ड्रामा 'हम' मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटात रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली होती. यापूर्वी, रजनीकांत आणि अमिताभ यांनी १९८३ च्या 'अंधा कानून' आणि १९८५ च्या 'अटक' या अॅक्शन चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली होती.
'थलाइवर १७०' या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासोबत मल्याळम सुपरस्टार फहाद फासिल आणि टॉलीवूड सुपरस्टार राणा दग्गुबती हे कलाकार दिसणार आहे. याशिवाय मंजू वॉरियर, किशोर, रितिका सिंह, दुशारा विजयन, जीएम सुंदर, रोहिणी, राव रमेश, रमेश थिलक आणि रक्षक यांचाही चित्रपटात समावेश आहे. रजनीकांत यांना आणखी एका नव्या चित्रपटात पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.