मुंबई: पुढारी वृत्तसेवा ; उन्हाचा तडाखा मे महिन्यातही कायम राहणार असून आठवडाभर कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असे भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) सांताक्रुझ वेधशाळेने म्हटले आहे.
एप्रिल महिन्यातील शेवटच्या दिवशी किमान 27 आणि कमाल 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस तापमान चाळिशीमध्ये राहिले. बुधवारपासून (1 मे) तापमानात थोडी घट अपेक्षित आहे. तरीही आज 26/37 अंश सेल्सिअस इतके तापमान असेल. गुरुवारी आणि शुक्रवारी कमाल तापमान 35 आणि 34 डिग्री सेल्सिअस राहील. मात्र, वीकेंडला कमाल तापमानात वाढ होईल. शनिवारी (4 मे) पारा 37 अंशांवर जाईल. रविवारी त्यात एकाने घट अपेक्षित आहे.
माझगाव (99) आणि बोरिवली-पूर्व येथील (90) वायू प्रदूषणात मंगळवारी घट आढळून आली. या दोन्ही ठिकाणचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) शंभरीच्या आत नोंदला गेला. हा एक्यूआय मध्यम कॅटेगरीमध्ये नोंदला जातो. वरील दोन ठिकाणे वगळता मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वायू प्रदूषण खराब कॅटेगरीमध्ये होते. सिद्धार्थनगर, वरळी (169), देवनार (166) आणि वरळीतील (158) एक्यूआय दीडशेपार राहिला.