हातकणंगलेचे मैदान, मात्र चर्चा शाहूवाडीची! आजी माजी आमदार चर्चेच्या केंद्रस्थानी

हातकणंगलेचे मैदान, मात्र चर्चा शाहूवाडीची! आजी माजी आमदार चर्चेच्या केंद्रस्थानी

सरूड; चंद्रकांत मुदूगडे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीमधून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात लढणार कोण ? निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार ? हा सद्या कळीचा मुद्दा बनला आहे. महायुतीत इलेक्ट्रिव्ह मेरिटवरून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी दोलायमान ठरली आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीत अद्यापही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मात्र, या नकारात्मक राजकारणात शाहूवाडी विधानसभा क्षेत्राचे प्रतिस्पर्धी आजी माजी आमदार चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. हातकणंगले (आधीचा इचलकरंजी) मतदारसंघाचा इतिहास पाहता आजवर पूर्वेकडील प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये लोकसभेचा सामना रंगल्याचे किंबहुना पूर्व भागानेच संसदेत प्रतिनिधित्व केल्याचे दिसून येते. यंदा निवडणुकीच्या उंबरठ्यावर या अलिखित नियमाला अपवाद ठरणारी चर्चा पश्चिम भागाला सुखावणारी ठरलीय म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही.

राज्यभरात लोकसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्याच्या दृष्टीने हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीच्या गोटात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना झुकते माप देण्याबाबत गेल्या दोनतीन महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. याला शेट्टी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत जाऊन घेतलेली भेट निमित्त ठरले. आघाडी धर्मात ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. मात्र, पक्षात सक्षम उमेदवाराची उणीव असल्यामुळे विजूगिशी नीतीचा अवलंब करताना वरिष्ठांच्या पातळीवर शेट्टींना बळ देण्याचा गुप्त समझोता झाल्याची उघड चर्चा मतदारसंघात सुरू झाली.

मात्र, 'सरळ चालेल ते राजकारण कसले' या उक्ती प्रमाणे हातकणंगले मतदारसंघात उमेदवारीच्या बाबतीत दोन्ही आघाड्यांमध्ये अतिसावध हालचाली सुरू आहेत. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. पण भाजपला कल चाचणी (सर्व्हे) मध्ये मानेंच्या विरोधात मतदारसंघात मोठा नाराजीचा सूर असल्याचे जाणवल्यामुळे महायुतीत पर्यायी उमेदवारांचा अप्रत्यक्ष नामघोष सुरू आहे. त्यात शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांचे नाव अग्रभागी राहिले आहे. ही चर्चा दुसऱ्या टोकाला पोहचतेय म्हंटल्यावर स्वतः कोरे यांनी पुढे येऊन इतक्यात लोकसभा लढणार नसल्याचे सांगितले आहे. ते पुढे कधीतरी लोकसभा निवडणुकीत उतरतील, असा अर्थ काढायला वाव आहे. साहजिकच सद्या तरी माने यांची दावेदारी भक्कम झाल्याचे बोलले जात आहे.

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. शेट्टींच्या निर्णयाची आणखी तीनचार दिवस वाट पाहण्याचे धोरण असले तरी शेट्टींनी नन्नाचा पाढा लावून धरल्यावर त्यांच्यामागे महाविकास आघाडीने फरफटत जावे का ? हा मुद्दा प्रकर्षाने पुढे येऊ पाहतोय. त्यातूनच 'मशाल' चिन्हावर उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवरच्या बैठकीत पक्षप्रमुख ठाकरेंनी केलेल्या सूचक विधानाला अनुसरूनच कोल्हापूरात बुधवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत तयारीच्या दृष्टीने बैठक झाली. या बैठकीत उमेदवार म्हणून माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, सुजित मिणचेकर यांच्या नावावर पुन्हा पुन्हा खल झाला. त्यादृष्टीने प्रचाराची रणनीतीही ठरवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शाहूवाडी, शिराळा, वाळवा तालुक्यासह हातकणंगले तालुक्यात एकदिलाने निवडणुकीत उतरल्यास महाविकास आघाडीला विजयाचा ठाम विश्वास वाटतो. बैठकीतला मसुदा सत्यात उतरला तर मात्र सत्यजित पाटील-सरूडकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. आणि दुरंगी वाटणारी निवडणूक यदाकदाचित तिरंगी वळणावर पोहचू शकते. तसे झालेच तर हातकणंगले मतदारसंघात पहिल्यांदाच पूर्व भागातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news