पहिली, दुसरीची पुस्तके पुढील वर्षी बदलणार

पहिली, दुसरीची पुस्तके पुढील वर्षी बदलणार

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठपुस्तकांमध्ये यंदा कोणताही बदल केला जाणार नाही. तर शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी म्हणजेच पुढील वर्षी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडीची नवीन पुस्तके नव्या राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे पहिली आणि दुसरीच्या पुस्तकांचे यंदा शेवटचे वर्ष असणार आहे.

आता झालेल्या शैक्षणिक वर्षापासून पथदर्शी स्वरूपात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके चार भागात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आता जूनपासून सुरु होत असलेल्या शैक्षणिक वर्षापासूनसुध्दा वह्यांची पाने असलेली पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

याबरोबरच गुजराती, कन्नड, तेलुगु, सिंधी, तमिळ व बंगाली या माध्यमांसाठी असलेल्या सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांची चार भागांमध्ये विभागणी करून एकात्मिक स्वरुपातील पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत.
या पाठ्यपुस्तकांमध्ये सरावासाठी आवश्यकतेनुसार वह्यांची पानेही असणार आहेत. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील, असे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकाचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे इयत्ता पहिली -दुसरीच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचनाही बालभारतीकडून देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news