Sana Khan Murder : ‘तो’ मृतदेह सना खानचा नाही; पोलीस डीएनए टेस्ट करणार

Sana Khan Murder : ‘तो’ मृतदेह सना खानचा नाही; पोलीस डीएनए टेस्ट करणार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : Sana Khan Murder : सना खान या बेपत्ता तरुणीचा तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही. मध्यप्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील शिराली तालुक्याच्या विहिरीत सापडलेला मृतदेह सना खानचा नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे. २ ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या सना खानच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीमुळे पुन्हा तिचा तपास घेण्याचे काम सुरु केले जाणार आहे. यामुळे मध्यप्रदेशमध्ये सापडलेल्या  कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटणे आता अवघड झालेले आहे.

सना खान यांचा धाकटा भाऊ मोहसीन खानच्या मते, हा मृतदेह सनाचा नाही. वयोगटाचा विचार करता हा मृतदेह 25 च्या घरात असून तो आदिवासी तरुणीचा असावा असे तिच्या अंगावरील ब्रेसलेट, दोऱ्यावरून निष्कर्ष काढण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आरोपी अमित शाहूचे भाजपात लागेबांधे लक्षात घेता स्थानिक जबलपूर पोलिसही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तिच्या आईने केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मिळालेल्या मृतदेहाची खात्री पटवण्यासाठी DNA टेस्ट केली जाईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज (दि. १७) माध्यमांशी बोलताना दिली. (Sana Khan Murder)

हरदा येथे कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहावरील कपडे सना खान यांनी अखेरच्या दिवशी घातलेल्या कपड्यांसारखे दिसत होते. त्यामुळे तो मृतदेह भाजपच्या कार्यकर्त्या सना खान यांचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण कुटुंबियांनी तो मृतदेह सना खानचा नसल्याचा दावा केल्यामुळे आता डीएनए तपासणीचा व ते तिच्या आईशी जुळण्याचा एकमेव पर्याय पोलिसांपुढे उरला आहे. आज (दि. १७) यासंदर्भात नमुने घेण्यात आले असून डीएनए चाचणीत काय सत्य पुढं येत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपीस कठोर शिक्षा होण्यासाठी मृतदेह सापडणे आवश्यक आहे. दरम्यान, आरोपी अमितच्या एका साथीदाराच्या शोधात नागपूर पोलिसांचे एक पथक तिकडे तळ ठोकून आहे. आरोपी मृतदेह नदीत फेकल्याचे सांगत असला तरी तो अनेकदा तपासाची दिशा भरकटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रश्नी पोलीस आयुकतानी दुजोरा दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news