नवी दिल्ली : प्रशांत वाघाये : महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या व्यावसायिकांना राष्ट्रीय राजधानीमध्ये मिळणारी संधी ही महाराष्ट्राची, स्थानिक भागाची व्यावसायिक ओळख देशभरात जगभरात पोहोचविण्याचे व्यासपीठ असल्याची भावना कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील तनुजा मौला मुल्लानी, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या सुरेखा जाधव आणि पुण्याचे संतोष मोरे यांनी व्यक्त केली. राजधानी दिल्लीत सध्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा सुरू आहे. दरम्यान, त्यांनी दै. 'पुढारी'शी संवाद साधला.
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात बचत गटाच्या माध्यमातून तनुजा मौला मुल्लानी यांनी लावलेल्या स्टॉलमध्ये गूळ, गूळ पावडर, मसाले, केळीपासून तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ, अशी उत्पादने आहेत. तनुजा मौला मुल्लानी यांनी विज्ञान विषयात पदवी मिळवली आहे. मात्र, शिक्षण मिळवून नोकरी करण्यापेक्षा त्या शिक्षणाचा उपयोग करून उद्योग करण्यात त्यांना सुरुवातीपासून आवड होती.
त्यामुळे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या गेली १७ वर्षे बचत गट चालवतात. या मेळाव्याबद्दल बोलताना तनुजा मौला मुल्लानी म्हणतात की, महाराष्ट्रातील उत्पादने दिल्लीत किंवा इतर राज्यांत उपलब्ध नसल्यामुळे मागणी चांगली असते. विशेष म्हणजे, कोल्हापूरची ओळख महाराष्ट्रासह देशात आणि जगात नेताना आनंद वाटतो तसेच या कामामुळे स्वतःला एक उद्योजक म्हणून ओळख मिळते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहातही हातभार लावता येतो, असेही त्या म्हणतात.
स्वतः डिझाईन केली पादत्राणे
संतोष मोरे मूळचे माथेरानचे आहेत, पुढे व्यवसायानिमित्त ते पुण्यात स्थायिक झाले. पादत्राणे बनवणे हा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. या व्यवसायातील तिसऱ्या पिढीचे ते नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांना विशेष प्रशिक्षण घेण्याची गरज पडली नाही. संतोष मोरे स्वतः डिझाईन तयार करतात. त्यांच्या या कामासाठी त्यांना पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारदेखील देण्यात आला.
डायट मिलेट स्नॅक्स
महाबळेश्वरच्या सुरेखा जाधव गेली ४ वर्षे बचत गट चालवतात. दिल्लीत व्यापार मेळाव्यात त्यांनी 'डायट मिलेट स्नॅक्स' हे उत्पादन आणले आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा उपयोग हे उत्पादन तयार करण्यासाठी केला जातो. आरोग्यासाठी हे चांगले असल्याचेही त्या म्हणतात.
महाराष्ट्राच्या दालनात ४८ गाळे
दरम्यान, भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र राज्याच्या दालनात एकूण ४८ गाळे उभारण्यात आले आहेत. यामध्ये राज्याच्या विविध भागांतून उद्योजक सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांसह देशातील इतर राज्यांमधूनही अनेक स्टॉल्स आणि उद्योजक आलेले आहेत. १४ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा व्यापार मेळावा २७ नोव्हेंबरपर्यत चालणार आहे.