Scholarship : स्कॉलरशिपसाठी अर्ज करताना अशी घ्या काळजी…

 Scholarship
Scholarship

शिक्षण घेताना येणार्‍या आर्थिक समस्यांचा सामना करण्यासाठी समाजातील अनेक संस्थांकडून शिष्यवृत्त्या दिल्या जातात. त्या कशा मिळवायच्या याची माहिती मात्र अनेकांना नसते. किंवा त्या मिळविण्यासाठी अर्ज कसा करायचा याचाही गंध नसतो. खरं तर तुमच्या अर्जापेक्षाही तुमची गरज, तुमची कुवत, तुम्हाला खरंच शिक्षणासाठी निधीची गरज आहे का, या सार्‍या बाबी त्या संस्था पाहात असतात. तरीही तुमचा अर्ज तुमची हुशारी आणि पात्रता अधोरेखित करतोच. तो कसा करायचा, यासाठी या काही टीप्स. ( Scholarship )

कोण देतंय याचा शोध घ्या

सर्वप्रथम कोणकोणत्या संस्था, संघटना शिष्यवृत्ती देतात, याचा शोध घ्या. तो शक्य तेवढा लवकर सुरू करा, कारण शिष्यवृत्ती अर्ज मागविल्यानंतर फारसा वेळ हातात नसतो आणि तुम्हाला तो वेळेत पूर्ण करून देणे शक्य होत नाही.

अर्जासंबंधी माहिती मिळवा

शक्यतो स्थानिक ठिकाणांना प्राधान्य द्या. कॉलेजच्या नोटीस बोर्डवरील सूचना वाचा. तिथेही बर्‍याचदा शिष्यवृत्तीच्या अर्जासंबंधी माहिती मिळते. जवळच्या शिक्षण समुपदेशकांनाही याविषयी माहिती असते. किंवा आर्थिक सल्लागार, ग्रंथपाल या मंडळीनांही माहिती असते. त्यांनाही विचारा.

अर्जात खरी माहितीच लिहा

तुम्हाला शक्य असेल तेवढ्या संस्थांना अर्ज करा. काही ठिकाणी छोट्या मुलाखती अथवा छोटीशी चाचणीवजा परीक्षा असते, ती बिनधास्त द्या. तुमची खरी खरी उत्तरे त्यात लिहा. संबंधित संस्था इतर मार्गांनीही तुमची माहिती काढू शकते, तेव्हा कोणत्याही प्रकारे त्यात खोटेपणा दिसणार नाही, याची काळजी घ्या. कारण तुमच्या प्रामाणिकपणावरच तुमची पात्रता ठरणार आहे.

अर्जाची वेळ पाळा

कोणत्याही प्रकारे अर्ज करायला उशीर करू नका. हवं तर कॅलेंडरवर कोणत्या वेळी काय आहे, याची नोंद करून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला अचूक वेळी त्या गोष्टी करणे शक्य होईल आणि कोणतीही संधी हुकणार नाही.

सर्व गोष्टींची पूर्तता करा

शिष्यवृत्ती प्रायोजकाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही पूर्ण करता आहात ना, याकडे लक्ष द्या. त्याद़ृष्टीने विचार करा. त्या गोष्टी पूर्ण करण्याचा कटाक्षाने प्रयत्न करा.

ऑनलाईन माहिती योग्य ठेवा

आता तुमच्या ऑनलाईन माहितीविषयी. तुमच्या गुगल अकाऊंटवरील माहिती अपडेट करा. तुमच्या नावान शोध घेतल्यावर काहीही चुकीची माहिती येत नाही ना, याची खात्री करा. फेसबुक अकाऊंटवरील माहिती नीट तपासून पाहा. त्यावरील बाळबोध, तुमच्या प्रतिमेला डागाळेल, असा मजकूर काढून टाका. तुमचे प्रोफाईल, ई-मेल आयडी प्रोफेशनल वाटेल, असा ठेवा, जेणेकरून तुमच्याविषयी कोणताही गैरसमज होणार नाही.

ई-मेल आयडी अधिकृत ठेवा

अर्जावरचा फोटोही योग्य आणि तुमच्या प्रतिमेला कोणताही धक्का पोहोचणारा नसावा आणि अर्ज त्याच ई-मेल आयडीवरून पाठवा, ज्यावर तुम्हाला प्रत्त्युत्तर मिळू शकेल. शक्य असेल तर अर्ज टाइप करूनच पाठवा. त्यातही स्पेलिंग्जच्या चुका नाहीत ना, याची खात्री करा. हवं तर जाणकार किंवा कुणाही वरिष्ठाला दाखवा. हे सर्व करताना काही संस्थांच्या, प्रायोजकांच्या अर्जात काही शंका निमार्र्ण होऊ शकतात. अशा वेेळी न घाबरता, थेट त्यांना फोन करून विचारा, पण असे करताना कोणत्याही प्रकारे तुमच अज्ञान प्रकट होईल असे बोलू नका. या काही टिप्स काटेकोरपणे पाळल्यात तर तुम्हाला चांगली शिष्यवृत्ती मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. ( Scholarship )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news