शरीरातील नाजूक भाग ‘स्वरयंत्रा’ची काळजी घ्या : डॉ. विनया चितळे चक्रदेव

शरीरातील नाजूक भाग ‘स्वरयंत्रा’ची काळजी घ्या : डॉ. विनया चितळे चक्रदेव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपले स्वरयंत्र हा आपल्या शरीरातील अतिशय नाजूक भाग आहे. स्वरयंत्राचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे पित्ताचा त्रास (अॅसिडिटी). याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण यामुळे स्वरयंत्राला इजा होऊ शकते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे कॅमेरा घालून स्वरयत्रांची तपासणी करणे सोपे आणि सहज झाले आहे. त्यामुळे त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेवून उपचार घेणे आवश्यक आहे, अशी माहिती कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. विनया चितळे चक्रदेव यांनी दिली.

यावेळी स्‍वरयंत्राविषयी माहिती देताना डॉ. विनया चितळे चक्रदेव यांनी सांगितले की, आपल्‍या स्‍वरयंत्रामध्‍ये दोन प्रकारच्या स्वरतारा असतात. या स्वरतारा आपल्या मानेच्या मध्यभागात प्रोटेक्टिव्ह आवरणामध्ये थॉयराईड कार्टिलेजच्या आतमध्ये असतात. बोलताना या स्वरतारा मिटल्या जातात आणि श्वास घेताना उघडल्या जातात. आपले स्वरयंत्र मायक्रो सेकंदात या सर्व क्रिया घडवून आणते.
स्वरयंत्र श्वास घेणे, बोलणे व गिळणे या महत्त्वाच्या क्रिया सांभाळते. जेव्हा आपण अन्न गिळतो, तेव्हा ते स्वरतारांच्यावरून अन्ननलिकेत जातात, त्यामुळे आपल्याला ठसका लागत नाही. खाताना कधीही बोलू नये, हे अगदी खरे आहे. आपल्या स्वरतारा या जेलीसारख्या असतात. त्यामुळे यामध्ये भरपूर पाणी असते.

स्वरयंत्र निरोगी राखण्यासाठी भरपूर पाणी प्या

जे आपला आवाज दैनंदिन कामकाजात वापरतात. उदा. गायक, शिक्षक, कॉलसेंटर्समध्ये काम करणारे यांनी आपले स्वरयंत्र निरोगी राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. साधारण दिवसभरात ४ ते ५ लिटर पाणी पिणे आवश्याक आहे, असेही त्‍यांनी सांगितले.
स्वरयंत्राचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे पित्ताचा त्रास (अॅसिडिटी). याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण यामुळे स्वरयंत्राला इजा होऊ शकते. सकाळी उठल्यानंतर तुमचा आवाज जर बदललेला वाटला, घशात काही अडकल्यासारखे वाटले किंवा सतत खाकरावे वाटले. तर अॅसिडमुळे स्वरतारांना सूज आली असण्याची शक्यता असते, असेही डॉ. डॉ. विनया चितळे चक्रदेव म्‍हणाल्‍या.

दोन आठवड्यांहून अधिक काळ आपला आवाजात बदल राहिल्‍यास…

दोन आठवड्यांहून अधिक काळ आपला आवाज जर घोगरा झाला असेल. तर आपल्या स्वरतारांची त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे. स्‍वरतारा कॅमेर्‍यातून बघून त्‍यावर सूज आहे का? गाठ तयार झाली आहे का? हे बघणे आवश्‍यक आहे.
स्‍वरतारांचा दुसरा शत्रू म्‍हणजे ॲलर्जी, (नाकामधून घशात गळणारी सर्दी ) आणि तिसरा शत्रू म्‍हणजे तंबाखू. ज्‍यामुळे स्‍वरयंत्राचा कॅन्‍सर होऊ शकतो. अशा या अवयवाची काळजी घ्‍या. रोज भरपूर पाण्याबरोबर प्राणायाम करणे देखील
स्वरयंत्राच्या काळजीसाठी आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news