युवादिन विशेष : राष्ट्राची विधायक शक्ती

युवादिन विशेष : राष्ट्राची विधायक शक्ती

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजे 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. विवेकानंदांना युवकांबद्दल नितांत आकर्षण होते. त्यांना मनापासून वाटायचे की, युवा ही राष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची; पण विधायक शक्ती आहे. राष्ट्राची जडणघडण हीत्या राष्ट्रातील युवा जर चारित्र्यसंपन्न असेल तर उत्कृष्ट प्रकारची होते.

'जो आपल्या कर्तव्याचा विसर न पडता, सतत विधायक कामात गुंतून राष्ट्र उभारणीच्या कार्याला सकारात्मक श्वास देतो, त्याला युवक म्हणतात,' अशी स्वामी विवेकानंदांनी युवकांची सुरेख पद्धतीने व्याख्या केलेली आहे. स्वामीजी म्हणायचे, 'युवकांनो, तुम्ही कृपा करून झोपू नका, उद्याची पहाट अनुभवा, पहाटे जो युवक उठतो, तो समंजस मनाचा, विधायक कार्यकर्ता होतो. पहाट तुम्हाला बर्‍याच प्रमाणात खूप काही शिकवते. अभ्यास, मनन आणि चिंतन यांचा त्रिवेणी संगम पहाटेतच असतो.' त्यामुळे ज्यांचे तारुण्य केवळ ओघाकडे वाहत चाललेले असते त्याबद्दल स्वामींना विलक्षण दुःख व्हायचे. स्वामीजींनी त्या तरुणांसाठी स्वतंत्र शिबिरे घेतली.

रामकृष्ण मिशनची स्थापना करून त्यांनी जगातील तरुणांना संघटित करण्याइतकी शक्ती निर्माण केली. स्वामीजी म्हणायचे, 'युवक ही विश्वपित्याची लाडकी लेकरे आहेत. जगातल्या सगळ्या जातींत कुठलाही युवक घेतला तर तो मानवतावादीच असला पाहिजे. माणुसकी आणि करुणा हे युवकांचे हृदय आहे; पण युवकांचा श्वास मात्र चिरंतन सत्याकडे जाणारा असला पाहिजे.' म्हणून वेदांमध्ये युवकांना जी प्रतिज्ञा करून दिलेली आहे, तू अमृताचा पुत्र आहेस, तू मृतवत नाही, तू अमृत आहेस. म्हणजे तू अखेरच्या श्वासापर्यंत काम करायचेस. कधीही कामाबद्दल कुरकूर करायची नाही.

आलेल्या प्रसंगाला समर्थपणे तोंड देण्याचे सामर्थ्य युवकांमध्ये निर्माण करायचे असते. त्यासाठी स्वामीजींनी युवकांच्या कार्यशाळा घेतल्या. आध्यात्मिक शक्ती युवकांच्या मनात कशी आणून द्यायची, याची एक ब्ल्यू प्रिंट स्वामीजींनी तयार केली. त्याला त्यांनी नाव दिले 'आध्यात्मिक दीप्ती'. ही आध्यात्मिक मशाल त्यांनी युवकांच्या हातात देऊन सांगितले की, आपल्या कर्तव्यामध्ये कसूर न करता, आपल्या मातृभूमीला समर्थ करणे आणि त्या मातृभूमीतून, मानवतावादी दृष्टिकोनातून सगळ्या माणसांनी बंधुभावाने राहणे हे पसायदान आहे.

'तरुणांना आवाहन' या पुस्तकात स्वामीजींनी खास तरुणांसाठी व्याख्याने दिलेली आहेत. त्यावेळी स्वामीजींनी तरुणांना दोन महत्त्वाची मूल्ये दिली. एक म्हणजे, आपल्या जगण्यावर आपले प्रेम असले पाहिजे; पण ते आंधळे आणिअहंकारीही नसावे. त्या प्रेमाला समंजसपणाचा एक पोत असावा आणि जगण्याला सुरेल संगीताचा सूर असावा. हा सूर त्यागाच्या भैरवीतून यावा; पण वसंत ऋतूच्या पहाटेमधूनही भुपाळीच्या भैरव सुरातून उद्याची पहाट सुंदरपणे वाचता आली पाहिजे.

आपण सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. पाश्चात्त्य आणि पौर्वात्त्य तत्त्वज्ञान किंवा विज्ञान अभ्यासले पाहिजे. त्यातून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की, ईश्वर हेच एकमेव सत्य आहे, आत्मा हाच एकमेव सत्य आहे आणि धर्म हेच एकमेव सत्य आहे. म्हणून आपल्या जीवनाचा आदर्श हा आपण निर्माण करायचा असतो. कृपा करून मोठ्या माणसांच्या मागे वेड्यासारखे धावू नका.

आपणच मोठे व्हा. मोठ्यांचे विचार घ्या; पण आम्ही काय करतो, त्या मोठ्यांना दैवत मानून त्यांच्या फक्त मिरवणुकांमध्ये धन्यता मानतो. त्यांच्या हाका देऊन आम्ही आमची तुंबडी भरून कशी घ्यायची याच उद्योगात असतो. त्यामुळे दैवतेही पुढे अंमळ दुबळी होऊ लागतात की काय, कोणास ठाऊक? तरुणांची महत्त्वाकांक्षा अशी नसावी. त्यांची महत्त्वाकांक्षा स्वयंस्फूर्त असावी. अशी महत्त्वाकांक्षा स्वतःच्या पायावर उभे राहून जेव्हा माणूस शिकतो तेव्हा विवेक, वैराग्य आणि संस्कृती यांचे भान येते. कठोर परिश्रमाशिवाय या गोष्टी प्राप्त होत नाहीत. म्हणून स्वामीजींनी अत्यंत कठोर परिश्रमांचा 'सहना भवतु सहनौभुनक्तु सहविर्यं कर्वावहै। तेजस्विनावधितमस्तु मां विद्विषावहै।' हा मंत्र दिला. त्यातून एकमेकांच्या अंतःकरणाचा ठाव घेऊन नवविश्व निर्माण करणारी प्रेरणा त्यांनी संपूर्ण विश्वाला दिली. म्हणूनच अनेक तरुणांना स्वामीजींच्या व्यक्तित्त्वाचा ध्यास लागला.

– श्रीकांत देवळे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news