सुजात आंबेडकर अमरावतीतून लोकसभा लढणार; वंचितच्या जिल्हा कार्यकारिणीचा उमेदवारी संदर्भात ठराव

सुजात आंबेडकर अमरावतीतून लोकसभा लढणार; वंचितच्या जिल्हा कार्यकारिणीचा उमेदवारी संदर्भात ठराव
अमरावती, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर अमरावतीतून लढण्याची शक्यता आहे. वंचित कडून महाविकास आघाडीमध्ये अमरावतीच्या जागेवर दावा देखील करण्यात आला आहे. त्यामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापत असून वेगाने अनेक घडामोडी घडत आहेत.
आज (दि.९) वंचितच्या जिल्हा कार्यकारिणीची तसेच महिला आघाडी व युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक विश्रामगृहावर पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्र परिषदेत वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश गवई यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने वंचित चे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवावी असा ठराव पारित केल्याचे सांगितले. या संदर्भात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान एकीकडे प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील काँग्रेसवर टीका करत असताना दुसरीकडे वंचितच्या जिल्हा कार्यकारिणीने एकमताने ठराव घेऊन सुजात आंबेडकर यांचे नाव अमरावतीतून पुढे केले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक चर्चांना उधाण आले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.सुजात आंबेडकर अमरावतीतून निवडणूक लढल्यास आंबेडकर विरुद्ध आंबेडकर असा वाद होऊन तुमच्यावर घराणेशाहीची टीका होणार नाही का? या प्रश्नाच्या उत्तरा दाखल वंचित चे जिल्हाध्यक्ष गवई यांनी आमचे दोनही पक्ष समजदार असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news