नागपूर: पुढारी वृत्तसेवा : महायुतीमध्ये असणारे शिवसेनेचे आमदार परत उद्धव ठाकरेंकडे जाणार नाहीत. असा विचार करणेही "मुंगेरीलाल के हसीन सपने" म्हटले पाहिजे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचा संकल्पाला साथ देण्यासाठी मनसे नेते राज ठाकरे येत असतील, तर त्यात वावगे काहीच नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राजू पारवे त्यांना डीपीडीसी अंतर्गत असलेल्या प्रस्तावांच्या संदर्भात भेटले. पारवे यांनी मलाही फोन केला होता असेही बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे व त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांना आजही दिवास्वप्न पडते, याचेच आश्चर्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिदे भाजपाने २० जागा जाहीर केल्या आहेत. ज्या जागांवर एकमत झाले आहे, त्या जागा घोषित करण्याची सहकारी पक्षांना मुभा आहे. महायुतीचे तिन्ही नेते एकत्र येतील व लवकरच उर्वरित जागांवर एकमत होईल.
भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जागा भाजपाच्या आहेत. त्यावर भाजप-महायुती एकत्र लढणार आहे. अॅड प्रकाश आंबेडकर हे आमच्या विचारांशी सहमत नाहीत, राजकारणात कायमचा शत्रू अथवा मित्र नाही. स्थानिक राजकारणामध्ये काही मतभेद असतात. विजय शिवतारे व अजित पवार यांच्यातील वाद व मतभेटही मिटतील. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा १६ मार्चला सायंकाळी नागपूरला येणार असल्याची माहिती त्यानी यावेळी दिली.