मुंबई : पुढारी वृत्तसेवा ; महायुतीमधील मुख्य घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 12 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ( Nationalist Congress Party )
संबंधित बातम्या
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत इच्छुक उमेदवारांसाठी नरिमन पॉईंट येथील महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात 5 आणि 6 मार्च रोजी यासंदर्भात आढावा बैठका होणार आहेत. या बैठकांत 16 जागांवर चर्चा होणार असली, तरी प्रत्यक्षात 12 जागा राष्ट्रवादीला सोडल्या जाणार आहेत.
मुंबईत होणार्या सर्व बैठकांना पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह महिलाध्यक्ष, युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, अल्पसंख्याक, ओबीसी, सामाजिक न्याय विभागांचे राज्यप्रमुख उपस्थित राहणार आहेत. 5 मार्च रोजी गोंदिया-भंडारा, नाशिक, दिंडोरी, उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई, हिंगोली, धाराशिव (उस्मानाबाद), रायगड, तर 6 मार्च रोजी कोल्हापूर, माढा, बुलडाणा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर (दक्षिण) आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघांसाठी आढावा बैठक होईल. ( Nationalist Congress Party )