सिंधुदूर्ग : कुडाळ-नेरूरचा शिमगोत्सव ठरला यादगार!

कुडाळ : शिमगोत्सवातील कलाविष्काराचे क्षण मोबाईलमध्ये टिपताना ना. आदित्य ठाकरे. दुसर्‍या छायाचित्रात कोंबडानृत्य साकारलेल्या सिद्धेश मालणकरचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना ना. आदित्य ठाकरे. सोबत खा. विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत.
कुडाळ : शिमगोत्सवातील कलाविष्काराचे क्षण मोबाईलमध्ये टिपताना ना. आदित्य ठाकरे. दुसर्‍या छायाचित्रात कोंबडानृत्य साकारलेल्या सिद्धेश मालणकरचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना ना. आदित्य ठाकरे. सोबत खा. विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत.
Published on
Updated on

सिंधुदूर्ग; प्रमोद म्हाडगुत:  नेरूरसारख्या एका छोट्याशा गावात गेली कित्येक वर्षे शिमगोत्सवात सादर होणारी कला आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने कुडाळ येथील क्रीडा संकुलनात सादर करण्यात आली. शिमगोत्सवासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवून कोकणातील खास करून सिंधुदुर्ग-नेरूरमधील कलाकारांची कला तब्बल एक तास डोळे भरून पाहिली. नुसती पाहिलीच नव्हे, तर कॅमेर्‍यात टिपून स्टेजवरून उतरत स्वतः कलाकारांसमवेत काही क्षण ताल धरला, संवादही साधला, तेही हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत. ना. ठाकरे यांनी या कलेला उत्स्फूर्त दाद देत कोकणची ही कला मुंबई-वरळीत घेण्यासाठी मी तुम्हाला आताच निमंत्रण देतोय… असे सांगत मायानगरीचे दार उघडले आहे. त्यामुळे नेरूरची कला गावपातळीवरून कुडाळ तालुका व आता पुढे मुंबईसारख्या मायानगरीत सादर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुडाळ तालुक्यातील नेरूर या छोट्याशा गावात सुतार बांधव गेली कित्येक वर्षे आपल्या कल्पकतेने धार्मिक कथांवर आधारित देव, देवता व दानव, पशु-पक्षी, प्राणी आदी चलचित्रे तयार करून शिमगोत्सवात आपल्या गावातच कला सादर करतात, मात्र आजपर्यंत ती कला तालुकापातळीवर सादर झाली नव्हती. म्हणूनच तेथील कलाकारांना एक चांगले व्यासपीठ मिळावे यासाठी आ. वैभव नाईक यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ क्रीडा संकुल येथे ही कला सादर करण्याचे निश्चित केले. खरं तर आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला (25 मार्च रोजी) हा कार्यक्रम होता. मात्र, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे जिल्हा दौर्‍यावर येत असल्याने दोन दिवस पुढे ढकलून तो कार्यक्रम सोमवार 28 मार्च रोजी सायंकाळी 7 वा. सादर करण्यात आला.

यासाठी आयोजकांनी नीटनेटके नियोजन केले होते. भव्य अशी बैठक व्यवस्था, स्टेज, लायटिंग, आवश्यक ती साऊंड सिस्टिम बसविण्यात आली होती. नियोजित वेळेत 7 वा. हा कार्यक्रम सुरू झाला. ना. आदित्य ठाकरे 8.30 वा.च्या सुमारास कार्यक्रम स्थळी हजर झाले. यावेळी ढोल ताशे व फटाक्याच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विलास मेस्ञी, सुरेश मेस्ञी, बाबा मेस्ञी, आण्णा मेस्ञी आदी कलाकारांनी आपण तयार केलेल्या वेगवेगळ्या कलाकृतींचे सादरीकरण केले. नेरूरच्या या कलाकरांनी सादर केलेल्या एक सो एक कलेने उपस्थित हजारो प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येकाला ही कला मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरता आला नाही. म्हापण येथील सिद्धेश मालणकर या युवकाने केलेले कोंबडानृत्य भाव खाऊन गेले.

ना. आदित्य ठाकरे यांनी त्याचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तब्बल 6 तास चाललेल्या या महोत्सवातील कला 'याची देही याची डोळा' पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. ना. ठाकरे यांनीही या कलाकारांच्या कलेचे खास कौतुक करत मुंबई-वरळीत येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी रेकॉर्डब्रेक प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे क्रीडा संकुल भरून गेले होते. खा. विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी खा. सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, बँक संचालक सुशांत नाईक, नगराध्यक्ष आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट आदी उपस्थित होते.

आनंद मेस्त्री ग्रुप प्रथम

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथील क्रीडा संकुल मैदानावर रोंबाट सादरीकरणात प्रथम आनंद मेस्त्री ग्रुप, नेरूर (21 हजार रुपये), द्वितीय विलास मेस्त्री गु्रप, नेरूर (15 हजार रू.), तृतीय लोकराजा सुधीर कलिंगण ग्रुप, नेरूर (10 हजार रू.) व उत्तेजनार्थ म्हणून बाबा मेस्त्री ग्रुप, ओंकार मित्रमंडळ नेरूर- वाघचौडी यांना प्रत्येकी 7 हजार रू. व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

शिमगोत्सव कलेला राजाश्रय मिळेल?

सिंधुदुर्गात खासकरून नेरूर गावातील या कलाकारांनी ही पारंपरिक कला मोठ्या कष्टाने जोपासली आहे. या कलेला मोठ्या प्रमाणात लोकाश्रय मिळत आहे. मात्र राजाश्रय मिळाला नाही. गावकुसावर सादर होणारी कला आ. नाईक यांच्या पुढाकारामुळे प्रथमच कुडाळ तालुकास्तरावर सादर झाली. विशेष म्हणजे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनी ही कला जवळून पाहिली आणि मुंबईत सादर करण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे या कलेला आता राजाश्रय मिळेल, अशी आशा कलाकारांसह तमाम सिंधुदुर्गवासीयांना वाटू लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news