‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य : औरंगजेब रंगमंचावर साकारणे आव्हान- डॉ. गिरीश ओक (मुलाखत)

डॉ. गिरीश ओक
डॉ. गिरीश ओक

डॉ. अमोल कोल्हे यांची छत्रपती संभाजीराजांची प्रमुख भूमिका असलेल्या 'शिवपुत्र शंभूराजे' या महानाट्याचे प्रयोग कोल्हापुरात ७ ते १२ एप्रिलदरम्यान होत आहेत. ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक 'शिवपुत्र संभाजी' या नाटकात बादशहा औरंगजेबाची भूमिका साकारत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा व्हीलन म्हणजे औरंगजेब ते साकारत आहेत. मी अनेक प्रकारचे व्हीलन यापूर्वी केले आहेत; पण जो व्हीलनसारखा दिसत नाही; पण प्रत्यक्षात व्हीलन असतो, असे पात्र करायला मला आवडतं. मला वाटतं औरंगजेब हा त्याच प्रकारचा व्हीलन आहे, असे डॉ. ओक सांगतात. महानाट्याच्या निमित्ताने डॉ. ओक यांनी दै. 'पुढारी'शी केलेली ही खास बातचित…

औरंगजेब ही भूमिका तुमच्याकडे आली, तेव्हा तुमची काय भावना होती?

मी तरुण असताना एका नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. तिथून प्रवास सुरू होऊन मी आता औरंगजेब ही भूमिका करतोय. औरंगजेब व्हीलन आहे; पण तो व्हीलन दिसत नाही. मला असे व्हीलन करायला आवडतात. त्यामुळे नकार द्यायचा प्रश्नच नव्हता; पण थोडंसं विचित्र वाटत होतं. एक तर प्रभाकर पणशीकरांचा औरंगजेब मी पाहिला होता.

महानाट्य हा फॉर्मही वेगळा होता; पण मी जेव्हा पहिल्यांदा औरंगजेब या गेटअपमध्ये तयार झालो, तेव्हा आमच्या निर्मात्यांनी तुम्ही औरंगजेब म्हणून खूपच छान दिसताय, असं सांगितलं आणि माझं दडपण कमी झालं. माझ्या आधी रवी पटवर्धन औरंगजेब करत होते.

औरंगजेब या भूमिकेनं कलाकार म्हणून काय दिलं?

औरंगजेब या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलायचं झालं, तर तो वाईट हेतूने काम करत असला, तरी त्याची अशी एक भूमिका आहे. तो आपल्या मुलांना सांगतो, तुम्हाला काही करायचं असेल तर संभाजीराजांसारखं बना. माझा एक जरी पुत्र संभाजीसारखा शूर असता, तर मी आलमगीर झालो असतो, असं तो म्हणतो. त्याला गुणांची पारख होती.. मात्र, तो वाईट हेतूने काम करत होता म्हणून त्याचं पारिपत्य झालं. इतिहासात कुप्रसिद्ध असलेल्या औरंगजेबाला रंगमंचावर साकारणे आव्हान होतं. हा एक फँटॅस्टिक अनुभव आहे.

महानाट्य हा फॉर्म तुम्ही प्रथमच करताय, काय सांगाल?

माझ्यासाठी हा फॉर्म अनेक अर्थांनी वेगळा होता. नाटकाला जास्तीत जास्त १,५०० लोकांसमोर परफॉर्म करण्याचा अनुभव होता; पण महानाट्यामध्ये १० पट मोठं स्टेज. प्रचंड संख्येने प्रेक्षक हे सुरुवातीला दडपवून टाकणारं होतं. आम्ही अलीकडेच निपाणीमध्ये प्रयोग केले. तिथे एकाचवेळी ३२ हजार प्रेक्षक होते. एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक ज्यावेळी दाद देतात, त्यांच्यासमोर अभिनय करणं हा वेगळाच उत्साहवर्धक अनुभव होता. महानाट्याचं आणखी एक वेगळेपण असं की, यातले सगळे संवाद आधीच रेकॉर्डेड असतात. त्या संवादानुसार अभिनय करावा लागतो. आपल्याला स्वत: काही अँडिशन घेता येत नाही. असं असताना नाट्याचा प्रभाव टिकवून ठेवणं हे खूपच वेगळं आणि आव्हानात्मक होतं, आमचे लेखक महेंद्र महाडिक यांनी अतिशय प्रभावी संवाद लेखन केलेय. या संवादावर एवढ्या प्रचंड संख्येतील प्रेक्षक एकाचवेळी दाद देतात, तो भारावून टाकणारा अनुभव आहे.

छत्रपती संभाजीराजांच्या चरित्रावरील हे महानाट्य कोणता संदेश देऊ पाहतंय ?

कोणतीही ऐतिहासिक व्यक्तिरेखा घेऊन ज्यावेळी एखादी कलाकृती येते. त्यावेळी निव्वळ मनोरंजन हा तिचा हेतू कधीच नसतो. छत्रपती संभाजीराजांचं व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. एकच व्यक्ती विद्वान होती, त्यांच्याकडे काव्य प्रतिभा होती आणि त्याचवेळी पराकोटीचा पराक्रमही होता. अशा गुणांचा संयोग एकाच व्यक्तिमत्त्वात असणं ही इतिहासात खूपच दुर्मीळ गोष्ट • आहे. म्हणून संभाजीराजांचं चरित्र अशा भव्य स्वरूपात येतं त्यावेळी त्याचा प्रभाव व्यक्तीवर दीर्घकाळ राहतो. जुन्या पिढीनं पुन्हा एकदा शंभूराजांना समजून घ्यावं. नव्या पिढीनं यातून प्रेरणा घ्यावी, हा या सादरीकरणामागचा उद्देश आहे. त्याची भव्यता, प्रभावी, संवाद यातून तो साध्य होताना दिसतोय.

कोल्हापूरशी तुमचं नातं नेमकं कसंय ? यापूर्वीचा कोल्हापुरातील अनुभव कसा वाटला?

कोल्हापुरात माझा एक जवळचा मित्र राहायचा. त्यामुळे माझा सातत्याने कोल्हापूरशी संपर्क आला. इथली मटण-भाकरी, मिसळ, दूध कोल्ड्रिंक्स आदी खाणंपिणं जितकं आवडतं, तितकीच इथली मोकळी ढाकळी माणसं आवडतात. कोल्हापुरात नाटकांचे अनेक प्रयोग केले. इथला दर्दी आणि हातचं राखून न ठेवता दाद देणारा प्रेक्षक, इथले पॅलेस थिएटर हे सगळं न विसरता येणारं आहे. २०१५ मध्ये कोल्हापुरात 'वेलकम जिंदगी' या नाटकासाठी आलो होतो. त्यानंतर कोल्हापूरला येणं झालं नाही. लॉकडाऊननंतर कोल्हापूरला प्रथमच येतोय. त्यामुळे कोल्हापूरच्या रसिकांना भेटण्याची मलाही उत्सुकता आहे.

– तानाजी खोत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news