नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० ते १०० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहे. अयोध्या, मथुरेत शिवसेना उमेदवार राहतील. अशात शिवसेनेच्या प्रचाराची सुरूवात मथूरेतून करा, असा स्थानिकांचा आग्रह असल्याने त्यासंबंधी लवकरच निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज केले. (Mathura constituency)
राऊत आजपासून पश्चिम उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते कष्टकरी, शेतकरी, मजूर वर्गाच्या नेत्यांची भेटीगाठी घेतली. ते संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख नेते राकेश टिकेत यांची देखील भेट घेणार आहे. निवडणुकीसंबंधी त्यांची भूमिका, मत आणि कल जाणून घेऊन शिवसेनेने कुठे आणि कुठल्या भागात किती उमेदवार उतरवायचे याचा निर्णय घेऊ, असे राऊत यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले.
समाजातील लहान-लहान घटकांतील नेते शिवसेनेसोबत चर्चा करीत आहे. यंदा निवडणुकीत पक्ष अस्तित्व दाखवून देत विधानसभेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व दिसेल, असा दावा राऊत यांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढत असतील तर आनंद होईल. परंतु, अयोध्येच्या मंदिरासाठी शिवसेनेने मोठा संघर्ष करीत बलिदान दिले आहे. संपूर्ण अयोध्येचे आंदोलन थंड पडले असताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात किमान तीनवेळा अयोध्येत जाऊन पक्षाने या मुद्द्याला चालना दिली आहे. न्यायालयाच्या आदेशाने मंदिर उभे राहत असले तरी मंदिराचे प्राथमिक श्रेय हे शिवसेनेचे असल्याचे राऊत म्हणाले. (Mathura constituency)
विरोधकांचे भाजप समोर कडवे आव्हान
उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला. यासंबंधी बोलताना राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशातील काही नेत्यांना हवेचा लवकर अंदाज येतो. यानूसार ते पक्ष बदलत असतात. कुणी कितीही ओपिनियन पोल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने दिले तरी जमिनीवरील स्थिती वेगळी आहे. भाजपला सहजतेने विजय मिळेल असे वाटत नाही. विरोधक एकवटले आहेत. यातून ही पळापळ सुरू आहे.
आम्ही कॉंग्रेससमोर झोळी घेवून उभे नाही!
महाराष्ट्राप्रमाणे गोव्यामध्ये एकत्रित लढू, असा प्रस्ताव कॉंग्रेससमोर ठेवून राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली होती. पंरतु, गोव्यातील स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात काय आहे हे माहिती नाही. पंरतु, आम्ही कॉंग्रेसमोर झोळी घेऊन उभे नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. एकूण जागेपैकी कॉंग्रेसने ३० जागा लढवाव्यात आणि उर्वरित १० जागा मित्रपक्ष लढवतील, असा तो प्रस्ताव होता.
ज्या जागांवर गेल्या ५० वर्षांमध्ये कॉंग्रेसला साधे खाते ही उघडता आले नाही अशा जागा मित्रपक्षांना देण्याचा प्रस्ताव आहे. कॉंग्रेस एकत्र लढली नाही तर सिंगल डिजिटमध्ये देखील त्यांचे उमेदवार निवडून येणार नाही. अशात आमच्यासारखे पक्ष त्यांना आधार देण्याचे काम करीत असल्याचे राऊत म्हणाले. भाजपने जनमताची चोरी करून यापूर्वी गोव्यात सत्ता स्थापन केली असल्याचे राऊत म्हणाले. राजकारणात धाडस महत्वाचे असते. पर्रिकर यांचा मुलगा अशा प्रवृत्तीविरोधात धाडस करीत असेल तर शिवसेनेची साथ त्यांना लाभेल असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.
हे वाचलंत का?