धुळे, पुढारी वृत्तसेवा : सेवानिवृत्तीच्याच दिवशी शिरपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यासह सहायक लेख अधिकारी यांना ५ हजारांची लाच घेताना धुळ्याच्या लाचलुचपत विभाग प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. उद्या शुक्रवारी पंचायत समितीच्या आवारात गट विकास अधिकारी शिंदे यांच्या सेवानिवृत्तीचा निरोप समारंभाचे नियोजन सुरू होत असतानाच त्यांच्या हातात बेड्या पडल्या आहेत.
शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक असणाऱ्या व्यक्तीने यासंदर्भात धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या शिक्षकाच्या घराच्या दुरुस्तीसाठी भविष्य निर्वाह निधीच्या जमा रकमेतून ना परतावा ५ लाख रुपये अग्रीम मिळवण्यासाठी त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी युवराज शिंदे यांच्याकडे अर्ज केला होता. हा ना परतावा अग्रिम मंजूर करण्यासाठी युवराज शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने या प्राथमिक शिक्षकांनी धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्याकडे तक्रार केली.
त्यानुसार या तक्रारीची खात्री केल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, कृष्णकांत वाडीले, भूषण खलानेकर ,प्रशांत चौधरी, कैलास जोहरे, शरद काटके, महेश मोरे आदी पथकाने शिरपूरच्या पंचायत समितीच्या कार्यालयात सापळा लावला. यावेळी शिंदे यांनी सहाय्यक लेखा अधिकारी चुणीलाल देवरे यांच्या हस्ते ५ हजारांची लाच स्वीकारली. रक्कम स्वीकारताच सापळा पथकाने या दोघांना रंगेहात पकडले आहे. विशेषता गटविकास अधिकारी युवराज शिंदे यांचा आज नोकरी काळातला शेवटचा दिवस होता. तर उद्या शुक्रवारी त्यांचा निरोप समारंभ करण्याचे नियोजन सुरू होते. मात्र, सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशीच लाच लुचपात प्रतिबंधक विभागाने त्यांना तडाखा देऊन गजाआड केले आहे.