Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : दसरा मेळाव्याच्या संघर्षातून शिंदे गटाची माघार? नेमके काय घडले

Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : दसरा मेळाव्याच्या संघर्षातून शिंदे गटाची माघार? नेमके काय घडले

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : आमचा दसरा मेळावा क्राॅस मैदानावर होणार आहे. ठाकरे गटाला केवळ सहानुभूतीचे राजकारण करायचे आहे. आम्हाला त्यांच्याशी भांडायचेच नाही, असे सांगत शिवसेना शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या संघर्षात एक पाऊल मागे घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्याचा ठाकरे गटाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. (Uddhav Thackeray Dasara Melava 2023 )

शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्यावरुन सुरु असलेल्या वादावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आमचा मेळावा क्राॅस मैदानावर होणार असल्याचे सांगत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आमचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईत ओव्हल जवळील क्राॅस मैदानावर होणार आहे. आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही. विकासाचे राजकारण करतो. त्यामुळेच वादात न जाता शिवाजी पार्कऐवजी दुसरे मैदान आम्ही घेतलेले आहे.  (Uddhav Thackeray Dasara Melava 2023 )

ठाकरे गट स्वत:च राजकारण करतो आणि स्वत:च प्रसिद्धी मिळवतो. त्यांना केवळ भांडायचे आहे, सहानुभुतीचे राजकारण करायचे आहे. बाळासाहेबांचे विचार त्यांनी केव्हाच सोडले आहेत. हिंदू धर्मावर टीका करणाऱ्यांविरोधात त्यांनी साधा ब्र ही काढला नाही, यावरुन त्यांचे विचार कुठे जात आहेत ते स्पष्ट होते, असे सांगत केसरकर यांनी ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली.

दरम्यान, शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी पत्र पाठविल्याने पेच निर्माण झाला आहे. मंत्री केसरकर यांनी आता क्राॅस मैदानावर मेळाव्याच सुतोवाच केल्याने या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. मात्र, शिंदे गटाकडून अद्याप शिवाजी पार्कच्या मागणीचा अर्ज मागे घेण्यात आलेला नाही. त्यामुळे, येत्या रविवारपर्यंत शिवाजी पार्क मैदानाबाबत निर्णय घेणार असल्याची माहितीही मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news