Sharad Pawar: अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेवर शरद पवारांचा खुलासा

Sharad Pawar: अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेवर शरद पवारांचा खुलासा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पक्षाचे अध्यक्ष पद अद्याप रिक्त नाही. हे पद रिक्त होईल तेव्हा नवीन अध्यक्षासंदर्भात विचार केला जाईल. तूर्त पक्षासाठी १०० टक्के आणि विरोधकांसाठी कार्य करणार, अशी ग्वाही राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनी आज (दि.१०) पत्रकार परिषदेतून दिली. दरम्यान पक्षातील नियुक्तींनंतर अजित पवार नाराज असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष करण्याची सूचना अजित पवार यांनीच केली होती. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही. गेल्या महिन्याभरापासून याविषयीची चर्चा पक्षातील सहकाऱ्यांमध्ये सुरु होती. लोकांच्या आग्रहास्तव सुप्रिया यांना कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. सर्व ज्येष्ठ  नेत्यांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

येत्या २३ जूनला पाटण्यात भाजप विरोधी पक्षांची बैठक असून यात काही मुद्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यावर इतर विरोधी पक्षांना सोबत घेवून जागा वाटपासंबंधी चर्चा करणार असल्याचे ते (Sharad Pawar)  म्हणाले. भाजपची ताकद जास्त असलेल्या मतदार संघात विरोधी पक्षाला सशक्त करण्याची सूचना काही पक्षांनी केली असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. विरोधकांचा चेहरा कोण राहणार? असा सवाल विचारला असता विरोधक एकत्रित येऊन निवडणूक लढवणार असून १९७६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांचा कुठलाही चेहरा नव्हता. निवडून आलेल्या नेत्यांकडून करण्यात आलेली मोरारजी देसाई यांच्या निवडीचे उदाहरण देत पवारांनी विरोधकांचा कुठलाही चेहरा राहणार नसल्याचे स्पष्ट केले.

कोल्हापूर दंगली प्रकरणी बोलताना पवार म्हणाले की, सांप्रदायिक विचारांना प्रोत्साहन देणारे पक्ष या घटनेमागे आहेत. लोकांनी शांत रहावे. दरम्यान, कोल्हापूर प्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी होत असताना ही बैठक बोलावणार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते, असे देखील पवारांनी स्पष्ट केले.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news